पारकर गटाची सरशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी संदेश पारकर गटाच्या माधुरी गायकवाड व उपनगराध्यक्षपदी कनैया पारकर यांची निवड झाली. काँग्रेसनेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या दोन्ही उमेदवारांचा एका मताने पराभव करून पारकर गटाने राणे यांचा घरचा आहेर दिला. त्यानंतर संदेश पारकर यांच्या घरावर भगवा फडकला. शिवसेना-भाजपा काँग्रेसचे बंडखोर पारकर गटाच्या सोबत राहिले.

कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक आज दुपारी पार पडली. नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन कोकण सिंचन महामंडळाचे उपाध्यक्षपद भूषविलेल्या संदेश पारकर यांनीच राणे यांच्या उमेदवारासमोर उमेदवार ठेवून घरचा आहेर दिला होता. संदेश पारकर यांना राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यास राणेनीच पुढाकार घेतला होता.

कणकवली नगरपंचायत काँग्रेस पक्षाच्या ताब्यात होती. यामध्ये राणे गटाचे समीर नलावडे नेतृत्त्व करत होते. नलावडे व संदेश पारकर यांच्यातील शक्तिप्रदर्शन या निवडणूकीत दिसले. सकाळी नगराध्यक्षपदाची तर दुपारी उपनगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत हात उंचावून मतदान घेण्यात आले. संदेश पारकर यांनी नारायण राणे कुटुंबाशी फारकत घेऊन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठी बंडखोर उमेदवार उभे केले. पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यांना ९ तर काँग्रेस राणे गटाच्या सुविधा साटम यांना आठ मते मिळाली. हाच उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात मावळत्या नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांनी पारकर गटाला साथ दिली. हाच प्रकार उपनगराध्यक्ष पदासाठी घडला. कनैय्या पारकर ९ मतांनी उपनगराध्यक्षपदी निवडले गेले तर बंडु हर्णे यांना आठ मते मिळाली.

काँग्रेस विरोधात बंडखोरी करणाऱ्या संदेश पारकर गटाला भाजपा व शिवसेनेच्या नगरसेवकांनी साथ दिली. या ठिकाणी पारकर यांच्याकडे पाच नगरसेवक होते. त्यांना शिवसेना तीन व भाजपा एक अशा चार जणांनी साथ दिली. त्यातच अ‍ॅड. प्रज्ञा खोत यांचे मत पारकर गटाला निर्णायक ठरले.

राणे यांना होम पीचवर संदेश पारकर यांची घरचा आहेर दिल्याने राजकीय तंबूत खळबळ उडाली. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक या निवडीदरम्यान नुतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाना शुभेच्छा देत खंबीरपणे पाठीशी उभे राहिले.संदेश पारकर यांच्या घरावर भगवादेखील फडकला. तसेच शिवसैनिकांनी भगवे झेंडे फडकावत संदेश पारकर आगे बढोच्या घोषणादेखील दिल्या. काँग्रेस पक्षाच्या पाच नगरसेवकांनी बंडखोरी केली. त्यांनी पक्षाच्या व्हीप पाळला नसल्याने नगरसेवकपद रद्द करण्यासाठी मागणी करणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी सांगितले.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rane get shock in kankavli mayor elections
First published on: 09-10-2015 at 02:39 IST