केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. “उद्धव ठाकरेंनी धोका दिला हे तर अख्खा महाराष्ट्र जाणतो. हा धोका केवळ भाजपासोबत झाला नाही, तर महाराष्ट्रातील जनतेसोबत धोका झाला,” असं मत रावसाहेब दानवेंनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (६ सप्टेंबर) दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.
रावसाहेब दानवे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी धोका दिला हे तर अख्खा महाराष्ट्र जाणतो. हा धोका केवळ भाजपासोबत झाला नाही, तर महाराष्ट्रातील जनतेसोबत धोका झाला. त्यावेळी भाजपा-शिवसेनेची युती झाली होती. मतं मागतानाच भाजपा-शिवसेना युतीसाठी मागितली होती. त्यानंतरचं बहुमतही युतीला मिळालं होतं. आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असा कुठलाही शब्द आम्ही दिला नव्हता.”
“तेव्हा उद्धव ठाकरेंनी आमचे सर्व पर्याय खुले असल्याचं म्हटलं”
“जेव्हा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह राज्यात आले तेव्हा त्यांनी स्टेजवरून आमचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील असं जाहीर सांगितलं. तेव्हा उद्धव ठाकरेंनी कोणताही आक्षेप घेतला नाही. मात्र, निकालाचे आकडे आले आणि आमच्याशिवाय सरकार बनत नाही हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी पूर्ण निकाल हाती येण्याआधीच आमचे सर्व पर्याय खुले असल्याचं म्हणण्यास सुरुवात केली,” असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
“अशा धोकाबाजापासून सावध राहा”
“याचा अर्थ त्यांच्या मनात खोट आली. त्यांनी भाजपालाही धोका दिला आणि राज्यातील जनतेलाही धोका दिला. अशा धोकाबाजापासून सावध राहा असं अमित शाहांनी म्हटलं. ते मत अगदी योग्य आहे,” असंही दानवेंनी नमूद केलं.