मंगळवारी दिवसभर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ देवेंद्र फडणवीसांच्या एका रॅलीमधला असून त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे देखील दिसत आहेत. या व्हिडीओवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक शब्दांत निशाणा साधताना “रावसाहेब दानवे अर्थात दाजींबद्दल हसावं की रडावं असा प्रश्न मला पडलाय”, अशा शब्दांत खोचक टोला लगावला आहे. या व्हीडीओवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टोलेबाजी सुरू झाल्याचं दिसत आहे.

नेमकं झालं काय?

सोमवारी औरंगाबादमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा जल आक्रोश मोर्चा पार पडला. यावेळी रस्त्यावर झालेल्या गर्दीमधून फडणवीसांची गाडी पुढे सरकत नसल्याचं लक्षात येताच एव्हाना फडणवीसांच्या सोबत गाडीत उभे असलेले रावसाहेब दानवे तडक गाडीतून खाली उतरले आणि एका कार्यकर्त्याच्या हातातला झेंडा घेऊन त्याच्या काठीनं गर्दीला बाजूला सारू लागले. केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या रावसाहेब दानवेंनी अशा प्रकारे स्वत:च गर्दीचं नियंत्रण करण्याचं काम हाती घेतलेलं पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

या गर्दीतून वाट काढत, गर्दीला बाजूला सारत दानवेंनी फडणवीसांची गाडी पुढेपर्यंत आणली आणि नंतर ते पुन्हा गाडीत जाऊन बसले.

दरम्यान, या प्रकारावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी रावसाहेब दानवेंच्या या कृतीवरून माध्यमांशी बोलताना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. तसेच, ओबीसी नेत्यांची भाजपामध्ये ही परिस्थिती होत असल्याची देखील टीका त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“रावसाहेब दानवे दाजींबद्दल हसावं का रडावं असा प्रश्न मला पडला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या गाडीसमोर बाऊन्सरची भूमिका वठवावी. ओबीसींचे नेते भाजपामध्ये कसे वापरले जातात, त्याचा हा एक प्रत्यय आला. तुम्ही कितीही मोठे नेते असलात, तरी तुम्हाला भाजपाच्या बाऊन्सरच्या भूमिकेत राहावं लागेल”, असं मिटकरी म्हणाले.