रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गणेश आगमनाची चाहुल लागली आहे. जिल्ह्यात गणेश उत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेला रत्नागिरीचा राजाचे रत्न नगरीत मोठ्या भक्तीभावाने व ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून रत्नागिरीकरांनी स्वागत केले. रविवारी सायंकाळी उशिरा पर्यत काढण्यात आलेल्या या मिरवणूकीमध्ये तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरला.
रत्नागिरीचा राजाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीकरांनी गर्दी केली होती. या राजाच्या मिरवणूकीला साळवी स्टॉप येथून सुरुवात करण्यात आली. ढोल ताशांच्या पथकासह डीजेच्या तालावर अवघी तरुणाई थिरकली. मिरवणूकी दरम्यान शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच या मिरवणूकीसाठी शहराच्या वहातूक व्यवस्थेत बदल करण्यात आला होता.
यावेळी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राज्याचे उद्योग मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वत: या मिरवणुकी मध्ये सहभाग घेतला. सर्व गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरया च्या गजरात रत्नागिरीच्या राजाचे स्वागत केले. येत्या २७ ऑगस्ट रोजी मारुती मंदिर येथील मंडपात या राजाची प्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.