या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील उमेदवार पाहता आगामी काळात या समितीवर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे वर्चस्व राहील, असे चित्र पुढे आले आहे.

या बाजार समितीची निवडणूक येत्या १३ एप्रिल रोजी होत असून जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव, संचालक शेखर निकम, किरण सामंत, अ‍ॅडव्होकेट  दीपक पटवर्धन यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर इत्यादी सर्वपक्षीय मातब्बर नेत्यांनी एकत्र येत ‘सहकार’ पॅनेल स्थापन केले आहे. या पॅनेलतर्फे समितीच्या सर्व, अकराही जागांवर उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्यांच्या विरोधात केवळ अपक्ष उमेदवार आहेत. अशा परिस्थितीत डॉ. चोरगेप्रणीत सहकार पॅनेलचा विजय निश्चित मानला जात आहे.

समितीच्या ११ जागांपैकी सहकार संस्था मतदारसंघातून ७, ग्रामपंचायत व पणन मंडळातून प्रत्येकी एक, तर व्यापारी-अडते मतदारसंघातून दोन उमेदवारांची निवड समितीवर होणार आहे. त्यापैकी सहकार मतदारसंघात केवळ एका जागेसाठी निवडणूक होणार असून ग्रामपंचायत मतदारसंघात सरळ लढत आहे. तसेच  व्यापारी-अडते मतदारसंघातून दोन जागांसाठी तीन, तर पणन मंडळाच्या एका जागेसाठी तिरंगी लढत होणार आहे. मात्र सहकार पॅनेलचे उमेदवार आणि सर्वपक्षीय आघाडीची रणनीती लक्षात घेता ही निवडणूक म्हणजे केवळ औपचारिकता असल्याचे मानले जात आहे. तसेच समितीवरील सुमारे पन्नास टक्के जागांवर जिल्हा बॅंकेचे संचालक निवडून आल्यास भविष्यकाळात त्यांचीच समितीच्या कारभारावर पकड राहील, अशी चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ratnagiri district agricultural produce market committee
First published on: 13-04-2016 at 02:10 IST