राजापूर – राजापूर तालुक्यातील मिळंद राववाडी येथे ३० कुटुंबांनी एकच गणपती आणण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरु ठेवली आहे. नवीन घर बांधले तरीही ते कुटुंब नव्याने गणेशमूर्तीची स्थापना न करता मूळ घरातील गणपतीच्या आराधनेसाठी एकत्र येतात. हा गणेशोत्सव विभक्त कुटुंबपद्धतीच्या आजच्या आधुनिक पिढीला एकतेचा संदेश देणारा ठरला आहे.
समाजात वावरताना सण, उत्सव साजरे करताना ते एकमताने एकोप्याने साजरे करावेत. त्यातून एक चांगला संदेश समाजात पसरवावा, या प्रमुख उद्देशाने लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना अस्तित्वात आणली. ती सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सुरू आहे; मात्र कोकणामध्ये घरोघरी गणेशमूर्ती आणण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना अंमलात आणण्यामागे एक चांगला हेतू समाजामध्ये निर्माण केला होता. कारण, या सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकी जपली जायची व त्यातून सर्वजण एकत्र येऊन उत्सव साजरा होतो, एक वेगळा उत्साह व आनंद निर्माण होतो. त्यामुळे स्वतंत्रपणे आर्थिक बाबीला त्रास सहन करावा लागत नाही. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव हा सगळीकडे प्रचलित झाला; मात्र कोकण किनारपट्टीवरती पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे घरोघरी गणपती आणण्याची परंपरा सुरू आहे; परंतु कालांतराने कुटुंब वाढत गेल्याने कुटुंबातील अनेक जणांकडून स्वतंत्र घर बांधण्याची प्रथा सुरू झाली. त्यामुळे घर तेथे गणपती, अशी पद्धत सुरू झाली.
साहजिकच, प्रत्येकाने हौसेने घर बांधल्यानंतर गणपती आणण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दिवसेंदिवस गणेशमूर्तीची संख्या वाढत गेली. प्रत्येकाला गणेशोत्सव काळामध्ये घरी येणे, क्रमपाप्त झाले; मात्र राजापूर तालुक्यातील मिळंद-राववाडी येथे विश्वासराव बंधूंच्या मूळ घरामध्ये कुटुंबे वेगळी झाली तरी त्यांनी आपल्या नवीन घरामध्ये गणपतीची मूर्ती न आणता वाडवडिलांपासून चालत आलेली प्रथा जपली आहे. त्यामुळे येथे ३० कुटुंबांचा एकच गणपती आणण्याची परंपरा कायम आहे.
एकत्र येण्याचा उत्सव
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. त्यामुळे सर्व कुटुंबे एकोप्याने नांदत होती. एकमताने सर्व कामे होत होती. त्यामुळेच ही परंपरा पुढे राहावी, या दृष्टीने एकच गणपतीची परंपरा कायम ठेवली. त्यामुळे पूर्वीच्या लोकांनी भविष्याचा विचार करूनच ही प्रथा ठेवली असल्याचे चित्र सध्याच्या काळावरून दिसत आहे. बदलत्या काळानुसार भविष्यातील पिढी नोकरीधंद्यानिमित्त शहराच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना येथे आल्यानंतर एकट्याने गणेशोत्सव साजरा करणे अवघड आहे. त्यामुळे सर्वांनी या उत्सवाच्या माध्यमातून एकत्र यावे आणि गुण्यागोविंदाने उत्सव साजरा करावा हाच उद्देश आहे, असे कुटुंबप्रमुख मोहन विश्वासराव यांनी सांगितले.