रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा जोर वाढला आहे. सलग दोन दिवस पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच नद्यांच्या पाणी पातळी देखील चांगलीच वाढ झाली आहे. लांजा येथे वहाळ तुंबल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली.
रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवार पासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील भात व नाचणी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कापण्यात आलेले पीक उन्हात वाळत घातलेले असताना पुन्हा पावसामुळे पिकाची नासाडी होवू घातली आहे. जिल्ह्याच्या सर्व भागात पावसाचा जोर वाढल्याने नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात असलेले कृत्रीम धबधबे पुन्हा कार्यान्वीत झाले आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लांजा तालुक्यात रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गावरील श्रीराम पुलाजवळील वहाळ तुंबले आणि पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास आसपासच्या भागातील अनेक घरांत पाणी शिरले. यामुळे त्या परिसरतील नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली. शेवटी तातडीने मदत म्हणून जेसीबी मशीन पाठवण्यात आले, परंतु तोपर्यंत स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी लोकांच्या मदतीसाठी गेले. काहीनी स्वतःच्या मालकीचे जेसीबी मशीन बोलावून वहाळ फोडण्याचे प्रयत्न केले.
रत्नागिरी जिल्हा गेल्या चौविस तासात एकूण ४१२.६ मिमी तर सरासरी ४५.८४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच मंडणगड तालुक्यात १८.३० मिमी, दापोली २८.५० मिमी, खेड ३२.०० मिमी, गुहागर ६८.२० मिमी, चिपळूण २६.३०मिमी, संगमेश्वर ३६.४० मिमी, रत्नागिरी ५२.०० मिमी, लांजा ११३.८० मिमी तसेच राजापूर तालुक्यात ३७.१० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
