रत्नागिरी: राज्यातील महायुतीच्या अंतर्गत वादाचा फटका स्थानिक पातळीवर देखील बसू लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीचे कोणतेच ठोस धोरण जाहीर न झाल्याने व स्वतंत्र निवडणुका लढण्याच्या स्थानिक नेत्यांच्या वक्तव्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत सापडले आहेत.
कोकणातील भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये सतत वादाची ठिणगी पडत असल्याने कोकणात महायुतीच्या युती बद्दल आता साशंकता निर्माण झाली आहे. पक्ष वाढीच्या चढाओढीत कोकणातील तिन्ही मंत्री एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडत आहेत. रायगडमधील मंत्री भरत गोगावले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जावून भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यावर केलेले आरोप राणे यांच्या वर्मी लागले आहेत. यामुळे दोन्ही पक्षातील तणाव स्थानिक पातळीवर जास्तच वाढला आहे. तसेच याला प्रत्युत्तर म्हणून मंत्री नीतेश राणे यांनी कोकणात भाजपाचे वर्चस्व असल्याचे सांगून येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढण्याची जणू घोषणाच केली आहे. यामुळे महायुतीतील दोन्ही पक्षात आता वर्चस्वासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील नुकतेच चिपळूण येथे झालेल्या एका कार्यक्रमात स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले आहेत. महायुती म्हणून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रीत लढण्याचा निर्णय घेणारे शिवसेना शिंदे गटाचे नेते या निवडणूका स्व बळावर लढण्याच्या घोषणा करु लागल्याने स्थानिक कार्यकर्ते आता संभ्रमावस्थेत सापडले आहेत. मात्र या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व शिवसेना या तिन्ही पक्षात युती न झाल्यास होणारे जागाचे विभाजन टळणार आहे. त्यामूळे जास्तीत जास्त जागा लढविण्याची संधी कार्यकर्त्यांना मिळणार असल्याने तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपा कडून होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणा-या निवडणूका कोणाला लाभदायक ठरणार का, याकडे आता जिल्हावासियांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच राज्यातील नेते या निवडणुकांच्या युती बाबत कोणता निर्णय घेणार याकडे आता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या वादाचा फायदा शिवसेना ठाकरे गटाला व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला होण्याची शक्यता वर्तविली जावू लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार आहेत. तसेच याबाबत अंतिम निर्णय राज्यातील पक्षाचे नेते घेतील. त्यानुसारच या निवडणूका लढवल्या जाणार आहेत. – राहुल पंडीत, जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट.