रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली व मंडणगड येथील नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीसाठी महायुती जाहीर होऊन सुद्धा महायुतीत संघर्षाची ठिणगी पडली आहे. या नगरपालिकासाठी इच्छुक उमेदवारांची नाराजी महायुतीला भारी पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या भाजपाच्या उमेदवारांनी अखेर शिवसेना शिंदे गटाची वाट धरली आहे. भाजपामधील तीन माजी नगरसेवकांना शिवसेना शिंदे गटाकडून तिकीट मिळवण्यात यश आले आहे. यामुळे महायुतीचा अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपरिषद निवडण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती व महाविकास आघाडी मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य घडल्याचे दिसून येत आहे. इतर पक्षातून तिकीट मिळवण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू झाली जिल्ह्यात महत्त्वपूर्ण मानलेल्या नगरपालिकेसाठी महायुती होऊन सुद्धा भाजप आणि शिवसेनेमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे तीन प्रमुख इच्छुक उमेदवार आता थेट शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार आहेत. या घडामोडीमुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपच्या या तिन्ही उमेदवारांनी शिवसेना शिंदे गटाकडुन उमेदवारी देण्यासाठी रविवारी रात्री मोठी राजकीय खलबते होवून या तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये राजू कीर प्रभाग क्र. ६ साठी, सौ. मेधा कुलकर्णी प्रभाग क्र. ६ साठी व सुशांत चवंडे याला प्रभाग क्र. १५ साठी उमेदवारी देण्यात आली आहे. हे तिन्ही उमेदवार शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढणार हे निश्चीत झाले आहे. हे तिन्ही उमेदवार आपापल्या प्रभागात भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात होते. महायुतीतील या बंडखोरीमुळे आता मोठा पेच निर्माण झाला आहे. यामुळे रत्नागिरी नगर पालिकेच्या निवडणुकीकडे आता सर्वांचेच लक्ष लागुन राहिले आहे.