रत्नागिरी – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चिपळूण येथील नेते प्रशांत यादव यांनी अखेर भाजपात प्रवेश करण्याचे निश्चीत केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेना पक्षात घेण्याचा खटाटोप वाया गेला आहे. राज्याचे मत्स्य विभाग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नीतेश राणे यांनी पिंपळी येथील वाशिष्ठी डेअरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत प्रशांत यादव येत्या १९ ऑगस्टला भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते प्रशांत यादव शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते. यादव यांना शिवसेनेत घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व आमदार कीरण सामंत यांनी वारवांर यादव यांच्या बरोबर भेटिगाठी वाढविल्या होत्या. मात्र त्यांच्या या प्रयत्नाला अपयश आले असून प्रशांत यादव यांनी भाजपात जाण्याचे निश्चीत केले आहे. याविषयीची घोषणाच राज्याचे मत्स्य विभाग मंत्री नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
यादव यांचा लवकरच येत्या १९ ऑगस्टमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाची औपचारिक घोषणा राज्याचे मत्स्य विभाग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नितेश राणे यांनी पिंपळी येथील वाशिष्ठी डेअरीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी नीतेश राणे म्हणाले, “प्रशांत यादव हे जिल्ह्यातील मोठे नेतृत्व आहे. कार्यकर्ता म्हणून नाही, तर नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघत आहोत. चिपळूण मध्ये वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातून त्यांचे मोठे काम आहे. त्यांनी अनेकांना रोजगार दिला असून सहकार क्षेत्रात देखील त्यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे असा नेता आमच्या पक्षात आला, तर निश्चितच आम्हाला फायदा होणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, प्रशांत यादवा यांचा प्रवेश १९ ऑगस्ट रोजी नरिमन पॉइंट येथील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात होणार आहे. या प्रवेश कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि इतर भाजपचे नेते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री उदय सामंत हे आमच्या मतदार संघातील ज्येष्ठ मंत्री आहेत. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असून यादव यांनी योग्यता पाहून भाजपात येण्याचा निर्णय घेतला असल्याचा टोला ही राणे यांनी लगावला. तसेच २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून प्रशांत यादव निश्चितच विजयी होईल असा विश्वास देखील मंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, राजेश सावंत, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक अधिकारी स्वप्ना यादव यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते.