रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात रविवारी पहाटे पासूनच कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल भक्तांची गर्दी उसळली. यावेळी करण्यात आलेल्या प्रथम पवमान पूजेचा मान सौ. माधवी व गौरव मनोहर हेळेकर यांना मिळाला. हेळेकर कुटुंबिय, विठ्ठल मंदिर देवस्थान पदाधिकारी, विठ्ठल मंदिर मित्रमंडळाच्या सदस्यांनी पूजेवेळी भरपूर गर्दी केल्याचे पहावयास मिळत होते. प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिरात पूजा, अभिषेक, आरती, छप्पन भोग नैवेद्य दाखवल्यानंतर विठ्ठलाच्या दर्शनाला प्रारंभ झाला. त्यानंतर काकड आरती, दिवसभर विविध भजन मंडळांची भजने यांमुळे वातावरण विठ्ठलमय झाले.
दरम्यान कै. दाजी नाचणकर, कै. अप्पा नाचणकर संचालित पायी दिंडी भार्गवराम मंदिर, परटवणे येथून श्री विठ्ठल मंदिरात पोहोचली आणि सारी भक्तमंडळी भावुक झाली. या दिंडीचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. विठुरायाच्या रथाची मिरवणूक रात्री १२ वाजता निघाली. ठरलेल्या मार्गावरून रथ फिरून आल्यावर हरिहरेश्वराची भेट पहाटे ५ च्या सुमारास तृणबिंदूकेश्वराच्या मंदिरात होते. त्यानंतर द्वादशीची काकड आरती केली जाते. ही प्रथा जपण्यात आली.
कोटीची उलाढाल
रविवारी कार्तिकी यात्रेत गर्दीने उच्चांक गाठला. विठोबाचे दर्शन घेऊन अनेकांनी जत्रेत खरेदी केली. या जत्रेतून सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जत्रेतील बहुसंख्य व्यापारी परजिल्ह्यातून आले होते. स्टॉल्स व फिरते विक्रेते होते. शोभेच्या वस्तू, लहान मुलांसाठी खेळणी, कपडे, रांगोळ्या, गृहोपयोगी वस्तू, कपडे, भांडी, घर सजावटीचे साहित्य, दागदागिने, शोभेच्या वस्तू विक्री उपलब्ध होत्या. रामआळी, गाडीतळ, काँग्रेस भवनच्या रस्त्यावर, टिळकआळीकडे जाणाऱ्या मार्गावरही बॅरिकेट्स लावल्याने व्यापाऱ्यांची मोठी गर्दी झाली. सायंकाळी उशिरापर्यत शहर परिसरात भक्तांची अलोट गर्दी झाल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
