रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात सलग चार ते पाच दिवस कोसळणा-या पावसाने कहर करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी सर्व तालुक्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील वाशिष्टी, कोदवली, नारंगी, अर्जुना व शास्त्री नद्यांनी इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरु केली आहे. तसेच खेड येथील जगबुडी नदी अद्याप ही धोका पातळीवर वाहत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वत्र सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
रत्नागिरी तालुक्यात रविवार दुपार पासूनच दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवार सकाळपासून पावसाने आपले रौद्र रूप दाखविण्यास सुरुवात केली आहे. या पावसामुळे रत्नागिरी शहरातील कोकण नगर येथील नायाब रेसिडेन्सीजवळ सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास एक संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत भिंतीखाली उभ्या असलेल्या तीन कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सततच्या पावसामुळे नायाब रेसिडेन्सी इमारतीची संरक्षक भिंत खचली आणि थेट खाली उभ्या असलेल्या तीन कारवर कोसळली. तसेच चांदेराई येथील नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ होत आल्याने येथील दुकानदारांचे टेन्शन वाढले आहे.
दापोली तालुक्यात गेले तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. बऱ्याच दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा नव्या जोमाने जोरदार हजेरी लावल्याने या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. दापोली दादर तसेच इतर अंतर्गत मार्गाना या पावसाचा फटका बसला आहे. तालुक्यातील असोंड गावातील वाडीअंतर्गत कुंभारवाडीकडे जाणारा रस्ता पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. यावर्षी या रस्त्याचे डांबरीकरण केले होत, तर या रस्त्यावर पाणी जाण्यासाठी मोऱ्या टाकण्यात आल्या होत्या. मात्र या पावसाने नवीन तयार केलेला रस्ता मोऱ्यांसह वाहून गेला. यासह दापोलील-उन्हवरे मार्गावर असोंड नदीजवळ रस्त्यालगतची दरड कोसळली आहे. गावतळे मार्गे दापोलीकडे येणाऱ्या आपटी-टाळसुरे नदी पुलावरून पाणी जात असल्याने काहीकाळ येथील वाहतूक बंद पडली होती. याचा त्रास अनेक नागरिकांना सहन करावा लागला.
संगमेश्वर तालुक्यात पडणा-या पावसामुळे संगमेश्वर-देवरुख मार्गावरील संगमेश्वर बस स्थानकाजवळच असलेल्या दुकानांचा नदीकाठचा भाग खचल्याने तीन दुकाने नदी पात्रात कोसळली. या दुर्घटनेत दुकानदारांचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेत बाबासाहेब प्रभावळे यांच्या ऑटोमोबाईल स्पेअरपार्ट्स दुकानाचे अंदाजे १ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच अजय निवळकर यांच्या टीव्ही दुरुस्ती दुकानासह दिलीप हरी जोशी यांच्या फोटो स्टुडिओचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. येथील सोनवी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने बाजारपेठेत पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे.
खेड तालुक्यात पावसाने कहरच केला आहे. क्षणाची ही उसंत न घेता संततधार पावसामुळे खेड शहराला असलेला पुराचा धोका अद्याप ही कायम राहिला आहे. खेड शहरातील सखल भागात पाणी भरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खेड येथील जगबुडी नदी अद्याप ही धोका पातळीच्या वर वाहत असल्याने शहराला असलेला पुराचा धोका कायम राहिला आहे. आवाशी येथे पाणी भरल्याने वाहतुक ठप्प झाली आहे.
मंडणगड व गुहागर तालुक्यांनाही पावसाने चांगलेच झोडपुन काढले आहे. तसेच राजापुर तालुक्यातील कोदवली नदी देखील इशारा पातळीच्या वर वाहू लागल्याने राजापुर शहरातील बाजातपेठेला पुराच्या पाण्याचा धोका वाढला आहे. राजापुर शहरातील जवाहर चौकाच्या दिशेने पाणी भरण्यास सुरुवात झाली असल्याने व्यापा-यांचे टेन्शन वाढले आहे.