रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात धनेश पक्ष्यांच्या अधिवासात आणि खाद्य वृक्षांच्या संख्येत होणारी घट लक्षात घेता धनेश मित्र निसर्ग मंडळ आणि सह्याद्री संकल्प सोसायटीच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून संकल्प सोसायटीने संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथे ‘धनेशाची राई’ निर्माण करण्याचा संकल्प हाती घेतला आहे.
या उपक्रमासाठी देवळे येथे सह्याद्री संकल्प सोसायटी देवरुख, देवळे ग्राम समृद्धी अभियान, श्रीदेवी कालिश्री रवळनाथ मंदिर समिती, वनविभाग, आयडीबीआय बैंक देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीदेव रवळनाथ मंदिराच्या परिसरातील देवराईत वृक्षारोपण करण्यात आले. सह्याद्री संकल्पचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे आणि विराज आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी बँक व्यवस्थापक प्रतीक मनवानी, चंद्रप्रकाश सैनी व अक्षांश टेंभुर्णे, महाराष्ट्र प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी सहयोग कराडे व सूरज तेली उपस्थित होते. महेंद्र चव्हाण व भरत चव्हाण या धनेश मित्रांच्या सहकार्यातून हा प्रकल्प देवळे गावात साकारण्यात येत आहे.
धनेशाच्या संवर्धनासाठी वृक्षांची केवळ लागवड करून न थांबता त्यातून अशा वृक्षांची शाश्वत बीज बँक तयार व्हावी आणि जंगलाचा शेतकरी असणाऱ्या धनेश पक्ष्यांच्या माध्यमातून या वृक्षांचा प्रसार व्हावा, अशी संकल्पना राबविण्यात येत आहे.