स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कृषीचालकांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शोषणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषीचालक शेतकऱ्यांवर एका खतासोबत दुसरं खत विकत घेण्याची जबरदस्ती करत आहेत. याशिवाय मूळ किमतीपेक्षा अधिक दराने खत विकत आहेत. यात बोगस बियाणांचाही समावेश आहे, असा गंभीर आरोप रविकांत तुपकर यांनी केला. तसेच यावर कृषी विभागाने कारवाई न केल्यास कृषीचालकांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना कपडे काढून फटके देऊ, असा इशारा तुपकर यांनी दिला. ते बुलढाण्यात माध्यमांशी बोलत होते.

रविकांत तुपकर म्हणाले, “संपूर्ण राज्यात खरिपाचा हंगाम आता सुरू होणार आहे. अशावेळी राज्यात कृषी चालकांकडून खतांसोबत लिंकिंगचं खत विकण्याची जबरदस्ती होत आहे. दुसरीकडे मूळ किमतीपेक्षा जास्त दराने खतांची विक्री होत आहे. याकडे सर्रास कृषी विभागाचं दुर्लक्ष आहे. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे तुम्ही संवदेनशील मंत्री आहात, असं आम्ही समजतो. मात्र, तुमच्या राज्यात हे काय सुरू आहे?”

“एकीकडे शेतकऱ्यांवर लिंकिंगचं खत जबरदस्ती थोपवलं जातंय, दुसरीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांना सांगतो या खताचा तुम्ही आग्रह धरू नका. म्हणजे काय? कोणतं खत घ्यायचं, कोणतं नाही याबाबत आम्हाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. कोणतं खत, बियाणं घ्यायचं याची अक्कल शेतकऱ्यांजवळ निश्चितपणे आहे. कारण तो आमचा पीढीजात धंदा आहे. परंतु काही कृषी चालकांकडून आणि व्यापाऱ्यांकडून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातोय. यामध्ये कृषी विभाग सहभागी आहे असं माझं स्पष्ट मत आहे,” असं रविकांत तुपकर यांनी सांगितलं.

रविकांत तुपकर पुढे म्हणाले, “बोगस बियाणं बाजारात येतंच कसं? तुमच्याकडे कारवाईसाठी यंत्रणा आहे, अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यांना गलेलठ्ठ पगार दिले जातात. ती यंत्रणा काय करते आहे? ती यंत्रणा कारवाई करत नसेल, तर याचा अर्थ कृषीचालकांचं, कंपन्यांचं आणि कृषी विभागाचं साटंलोटं आहे, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे.”

“यापुढे कुठल्याही शेतकऱ्याला लिंकिंगची म्हणजे एका खतासोबत दुसरं खत घ्यावं लागेल अशी जबरदस्ती केली, मूळ किमतीपेक्षा जास्त दराने खताची, बियाणाची विक्री केली, बोगस बियाणं विकलं गेलं आणि हे आमच्या लक्षात आलं, मग त्या कृषी चालकाचे कपडे काढून, त्याला रस्त्यावर आणून फटके दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही त्या अधिकाऱ्यांचे देखील कपडे काढून आम्ही त्यांना रस्त्यावर आणू,” असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

हेही वाचा : “९० हजार ते १ लाख कोटी रुपये विमा कंपन्यांच्या घशात घातले”; ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचा गंभीर आरोप

“दादा भुसे यांनी ही वेळ आमच्यावर आणू नये. आमच्या संयमाचा अंत पाहू नका. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमकपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असंही तुपकर यांनी नमूद केलं.