रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पूर्वी बापाने केलेलं पाप मुलाला फेडावं लागत होतं. पण, कलयुगात जो पाप करतो, त्याला फेडावं लागते. शरद पवार यांना हे पाप फेडावं लागणार आहे. भविष्यात हा सैतान गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सदाभाऊ खोत म्हणाले, “महाराष्ट्रातील राजकारण हे प्रस्थापितांकडून विस्थापितांकडे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, वसंतदादा पाटील यांचं मोठं योगदान आहे. ८० च्या दशकात महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा उदय झाला. तिथून राजकारण्याच्या ऱ्हासाला सुरुवात झाली.”

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या पक्षफुटीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जसे दिसते, तसे…”

“शरद पवार यांच्यावर नियतीने मोठा सूड उगवला”

“या राजकारणात वाडे विरुद्ध गावगाडे, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष शरद पवारांच्या कालखंडात उभा राहिला. गेल्या ५० वर्षात हे सुरु आहे. शरद पवारांनी सरदारांना बरोबर ठेवून राज्य केलं. त्या सरदारांनी शेतकऱ्यांची घरे लुटली. गावगाडा उद्ध्वस्त केला. ते सरदार आज सैरभैर पळत आहेत. शरद पवार यांच्यावर नियतीने मोठा सूड उगवला असून, त्यांना गावगाड्याकडे धावत यावं लागत आहे,” असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.

हेही वाचा : “…तेव्हा अमित शाहांनी दिलेला शब्द पाळला नाही”, बंद दाराआड झालेल्या चर्चेवर उद्धव ठाकरेंचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“शरद पवारांना हे पाप फेडावे लागणार आहे”

“पुण्यात ‘काका मला वाचवा’ ही हाक महाराष्ट्राला ऐकू आली होती. पण, आता नवीन हाक महाराष्ट्राला ऐकू येत आहे, की पुतण्यापासून मला वाचवा. जैसी करणी वैसी भरणी. पूर्वीच्या काळात बापाने पाप केल्यावर मुलाला फेडावं लागत होते. मात्र, कलयुगात जो पाप करतो, त्यालाच ते फेडावं लागते. शरद पवारांना हे पाप फेडावे लागणार आहे. भविष्यात हा सैतान गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये, यासाठी आम्हा कार्यकर्त्यांना काम करावे लागणार आहे,” असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.