“काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व निधी, योजना आणि कामं पळवली म्हणत, शहाजीबापू पाटलांनी अजित पवारांवर टीका केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध कारणांमुळे ‘मातोश्री’वर थांबायचे पण अजित पवार पहाटेच मंत्रालयात यायचे, अशी टीका शहाजीबापू पाटलांनी केली आहे. ते जळगावात एका जाहीर सभेत बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारमधील खदखद बोलून दाखवताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत सर्व काही ठीक होतं. महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेना युतीचं सरकार स्थापन होणार होतं. पण अचानक आम्हाला एका हॉटेलमध्ये बोलवण्यात आलं. तिथे एक आठवडाभर आम्हाला ठेवलं. तेथून दुसऱ्या हॉटेलमध्ये नेलं तिथेही आठवडाभर ठेवलं. मग तिसऱ्या हॉटेलमध्ये नेलं, शाळेतली पोरंसुद्धा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जात नाहीत, तसे त्यांनी आमदारांना पळवलं.

हेही वाचा- “…म्हणून शिवाजी पार्कवर भाषण करण्यास गुलाबराव पाटलांवर बंदी घातली” एकनाथ शिंदेंचा खुलासा, म्हणाले…

त्यामुळे आम्हालाच वाटायला लागलं की, आम्ही आमदार आहोत की कोण आहोत? कुणी पण उचलतंय आणि कुठेपण घेऊन जातंय. या सर्व घडामोडीनंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार हे समजल्यावर आम्ही सगळ्या ५६ आमदारांनी आनंदाने ही बाब मान्य केली, असंही ते म्हणाले.

हेही वाचा- “महाविकास आघाडीतून बाहेर पडावं म्हणून मी पाच वेळा…” एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहाजीबापू पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्या अडीच वर्षात आम्हाला चांगला अनुभव आला नाही. वेगवेगळ्या कारणांसाठी उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर थांबायचे. तो अजित पवार पहाटेच मंत्रालयात येऊन बसायचा. अकरा वाजता मंत्रालय उघडायचं आणि हा बाबा सकाळी साडे सातलाच मंत्रालयात येऊन बसायचा. या काळात राष्ट्रवादीने सगळा निधी नेला, त्यांनी सगळी कामं नेली, सगळ्या योजना नेल्या. आम्ही मात्र मुख्यमंत्र्यांचे आमदार म्हणून मंत्रालयाच्या परिसरात तोंड बारीक करून हिंडत बसायचो. याच एका कारणासाठी आम्ही ५० आमदारांनी ठरवून एकनाथ शिंदेना सांगितलं, काहीतरी निर्णय घ्या. अन्यथा येणारी विधानसभेची आणि लोकसभेची निवडणूक एवढी सोपी राहणार नाही. आपल्याला राष्ट्रवादीनं निम्मं गिळलं आहे, बाकीचं गिळल्याशिवाय राष्ट्रवादी शांत बसणार नाही. यानंतर अखेर एकनाथ शिंदेंनी धाडस केलं.