धुळे-नंदुरबार जिल्हा बँक पुनरूज्जीवित करण्याचे संकेत देतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही विघ्नसंतोषी नंदुरबारच्या विकासाआड येत असल्याचा टोला हाणत जणूकाही आगामी निवडणुकांच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले.
येथे आयोजित काँग्रेसच्या नाशिक विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. आगामी निवडणुकांकरिता काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर अधिक जबाबदारी आपण टाकणार आहोत. काँग्रेस श्रेष्ठींचा नंदुरबार जिल्ह्यावर विश्वास आहे. त्यामुळेच देशातील कोणत्याही कार्यक्रमाची सुरूवात याच जिल्ह्य़ातून केली जाते. नंदुरबार चा हा विभागीय मेळावा आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा मुहूर्तमेढ रोवणारा आहे. जिल्ह्य़ातील कोणतेही प्रश्न असोत ते सोडविण्यासाठी चंद्रकांत रघुवंशी आपल्याकडे येत असतात. या जिल्ह्य़ातील तळोद्याच्या हातोडा पुलासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असून साक्री येथील सौर ऊर्जा प्रकल्प देखील मार्गी लावला जाईल. धुळ्याच्या पाण्याचा वाद सुरू असला तरी तो आपण न्यायिक पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.
यावेळी रघुवंशी यांनी नंदुरबारची जनता भ्रष्टाचार विरोधात लढत असल्याचे फलीत पालिका निवडणुकीत दिसून आल्याचे सांगितले. यापूर्वी आम्ही हरलो होतो ते केवळ आदिवासी विकास विभागापुढे, असेही ते म्हणाले. खा. माणिकराव गावित यांनी आदिवासी विकास निधी म्हणून २० हजार कोटी रुपये मिळाले. मात्र आदिवासींचा विकास झाला नाही. या विभागात भ्रष्टाचाराचे थैमान माजले आहे. त्यामुळे सिंचन घोटाळ्याप्रमाणेच या विबागाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा मेळावा राज्यातील काँग्रेसला फलदायी ठरेल असे तर, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसची ताकद म्हणजे जनसामान्यांची ताकद असून ती या जिल्ह्य़ाने दाखविली असल्याचे नमूद केले. मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वनमंत्री पतंगराव कदम हेही उपस्थित होते.
दरम्यान शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाणता राजा चौकात करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पद्माकर वळवी, खा. गावित, आ. अमरिशभाई पटेल, के. सी. पाडवी आदी उपस्थित होते. केंद्र शासन पुरस्कृत या योजनेत केंद्र शासनाचे २०.७५ कोटी रुपये व राज्य शासनाचे २.५९ कोटी तर नगर परिषदेचे २.५९ कोटी रुपये असे एकूण २५.९३ कोटी खर्च आला आहे. या योजनेंतर्गत शहरातील नवीन वसाहतीत व शहरात पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्णत्वास आले असून आतापर्यंत १३० किलोमीटर पाइपलाईन टाकण्यात आली आहे. शहरात चार ठिकाणी जलकुंभ बांधण्याचे काम पूर्ण झाले आहेत. तत्पूर्वी पोलीस कवाात मैदानावर मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरीया यांनी स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. आर. नायक, अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात, सहाय्यक जिल्हाधिकारी सुमन रावत, अनिल भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती आदी उपस्थित होते.