सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या ८१ गावातील शेतीच्या पुनर्बांधणीचे काम सुरू झालंय. आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून खंडाळा तालुका जेसीबी असोसिएशन आणि सातारा प्रशासन यांच्या संयुक्त मदतीतून हे काम होत आहे. संपूर्ण यंत्रणा गावा गावात जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पुनर्बांधणीचे काम करत आहे.

जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने सातारा जिल्ह्यातील असंख्य गावांना मोठा फटका बसला. यामध्ये तब्बल १५८० हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले. शासनाच्या तोडक्या यंत्रणेमुळे आजही असंख्य गावांना मदत मिळाली नाही. महाबळेश्वर तालुक्यातील ८३ गावातील शेतीचे मोठे नुकसान पावसाने झाले होते. येथील शेती पूर्णतः वाहून गेली आहे, तर अनेक गावातील शेती नापीक होण्याची भीती आहे. परंतु आमदार मकरंद पाटील यांनी खंडाळा तालुका जेसीबी असोसिएशन आणि सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सहकार्याने महाबळेश्वर तालूक्यातील बाधित गावांना मोठा दिलासा दिला आहे. नाम फौंडेशननेही झांझवड आणि वाघावळे या दोन गावात शेतीच्या पुनर्बांधणीचे काम केले आहे.

७५ जेसीबी, ८ पोकलेन, ४ डंपर आणि ३ ट्रॅक्टर कामाला

या लोकांचे झालेले नुकसान पाहता त्यांना हातभार लावण्यासाठी तब्बल ७५ जेसीबी, ८ पोकलेन, ४ डंपर आणि ३ ट्रॅक्टर अशी यंत्रणा खंडाळा तालुका जेसीबी असोसिएशनने उपलब्ध करुन दिली. आता ही संपूर्ण यंत्रणा महाबळेश्वर तालुक्यातील ८१ गावात पोहचली आहे.

शेतीच्या पुनर्बांधणीसाठी आमदार मकरंद पाटील यांचे सातत्याने प्रयत्न

महाबळेश्वर तालुक्यात ८१ गावात झालेल्या शेतीचे नुकसान व पुनर्बांधणी यासाठी आमदार मकरंद पाटील सातत्याने प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी खंडाळा तालुका जेसीबी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. माबळेश्वर तालुक्यांमध्ये आपल्याला शेतीच्या पुनर्बांधणीचे काम मोफत करावयाचे असल्याचे त्यांच्या गळी उतरविले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून गावात झालेल्या नुकसानीची पाहणी

खंडाळ्यातील जेसीबी असोसिएशनने याला मान्यता दिल्यानंतर आमदार मकरंद पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याशी चर्चा केली. या गावात झालेल्या नुकसानीची पाहणी तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी केली होती. यानंतर शेखरसिंह प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनीही पाहणी केली होती.

हेही वाचा : कोयनानगरला भूकंपाचे सौम्य धक्के, तर उस्मानाबादमध्ये भूगर्भातील हालचालींनी हादरली घराची छपरं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार मकरंद पाटील यांनी या पुनर्बांधणी कामासाठी सर्व यंत्रणा मोफत मिळवली असून यासाठीच्या इंधनाचा खर्च जिल्हा नियोजन मंडळातून करण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी परवानगी दिली आहे. संपूर्ण यंत्रणेद्वारे गावा गावात जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पुनर्बांधणीचे काम आजपासून सुरू झाले. ही मोहीम पुढील १५ दिवस सुरू राहणार आहे. साधारण जुन जुलै महिन्यात या भागात भात लागवडीसाठी लगबग सुरू होते आणि या शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतात भात शेती करता यावी यासाठी त्यांना शेत तयार करुन देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती वाई प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिली.