कराड : कोयना धरणात पावसाळ्याच्या मध्यापर्यंतच ९६ टीएमसी, अब्ज घनफूट (धरण क्षमतेच्या ९१.२१ टक्के) अशा विक्रमी पाण्याची आवक होताना, धरणसाठा नियंत्रित राखण्यासाठी सहा वक्री दरवाजे दोनदा उघडून १६.९८ टीएमसी (धरण क्षमतेच्या १६.१३ टक्के) पाण्याचा कोयना नदीपात्रात विनावापर विसर्ग करण्यात आला आहे. तर, पायथा वीजगृहातून ६.४८ टीएमसी (धरण क्षमतेच्या ६.१५ टक्के) पाणी वीज निर्मितीसाठी उपयोगात आले आहे. सध्या कोयनेचा धरणसाठा ८७.२३ टीएमसी (धरण क्षमतेच्या ८२.८८ टक्के) असून, जवळपास अर्ध्या टीएमसी पाण्याची धरणात आवक होत असून, धरण क्षमतेने भरण्यासाठी १८.०२ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
पश्चिम घाटक्षेत्रातील जोरदार पाऊस पूर्णतः ओसरताना, कोयना धरणातून दोन दिवसांपासून संपूर्ण विसर्ग बंद असल्याने तूर्तास तरी कृष्णा-कोयना नद्यांना पूर, महापूर संभवत नसून, दुथडी भरून वाहणाऱ्या या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. पावसाचा जोर अगदीच ओसरल्याने खरीप पेरण्यांना दिलासा मिळताना बळीराजाला धीर आला आहे. श्रावणी ऊन- पावसाच्या वातावरणामुळे लोकांमध्ये चैतन्य दिसून येत आहे.
कोयना धरणातून जलविसर्ग ठप्प असला तरी, सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणातून ७४० क्युसेक, उरमोडीतून ५००, तारळीतून ४९५ क्युसेक असा अन्य प्रमुख जलाशयातून जलविसर्ग करण्यात येत आहे. पावसाळ्याचा बहुतांश कालावधी शिल्लक असताना, सातारा जिल्ह्याचा जलसाठा मात्र, ८५ टक्क्यांच्या घरात पोहचला आहे. प्रमुख सहा आणि मध्यम व लहान १० अशी १६ धरणे जिल्ह्यात असून, त्यांची पाणीसाठवण क्षमता १५७.४८ टीएमसी असताना या सर्व धरणांमध्ये १३३.८४ टीएमसी (८४.१३ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे.
कोयना धरणाच्या दरवाजातून बंद करण्यात आलेल्या जलविसर्गामुळे कृष्णा-कोयना नद्यांची जलपातळी घटणार असल्याने नद्यांकाठच्या जनतेला दिलासा मिळाला आहे. सध्या कोयना धरणातील जलआवक ६ हजार ५७३ क्युसेकवरून ५ हजार १७३ क्युसेकपर्यंत खाली आली आहे. त्यात २४ तासात हा धरणसाठा ०.४४ टीएमसीने वाढला आहे. कोयना पाणलोटात रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत १८.३४ मिमी. पाऊस झाला आहे. तर, यंदा आजवर सरासरी ३ हजार ३५४ मिमी, (एकूण वार्षिक सरासरीच्या ६७.०८ टक्के) पावसाची नोंद आहे.
रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोयना पाणलोटक्षेत्रात महाबळेश्वरला ३, नवजाला १ तर, कोयनानगरला शून्य मिमी. पावसाची नोंद आहे. जांभळी, दाजीपूर अशा मोजक्या ठिकाणांचा अपवाद वगळता अन्य पश्चिम घाटात आणि धरणक्षेत्रातही तुरळक पावसाचेच चित्र आहे.