हर्षद कशाळकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग : एका हाताने दिले दुसऱ्या हाताने काढून घेतले अशी गत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांची झाली आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. येवढेच नव्हे तर दोन वर्षांत दिलेली रक्कम वसूल करण्यात आली आहे. जिल्ह्यात २६ हजार ६१८ शेतकऱ्यांकडून ११ कोटी ४७ लाख ३२ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सन्मानाने दिलेली रक्कम सक्तीने वसुली सुरू केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

केंद्र सरकारच्या पुढाकाराने देशभरात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना २०१८ सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २ हेक्टरपेक्षा कमी जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्तय़ांत दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होत असते. या महत्त्वाकांक्षी योजनेतून रायगड जिल्ह्यातील १ लाख ७३ हजार ८४१ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यांच्या खात्यात योजनेचा मदत निधी जमाही करण्यात आला होता.

आता मात्र यातील अनेक शेतकऱ्यांना कृषी आयुक्त कार्यालयाने योजनेसाठी अपात्र ठरविले आहे. अपात्र शेतकऱ्यांची यादी संबधित जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली आहे. यानंतर महसूल प्रशासनाकडे योजनेअंतर्गत अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दोन वर्षांत त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम सात दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे जे शेतकरी ही रक्कम परत देणार नाहीत त्यांच्यावर जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १७४ अन्वये कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

योजनेसाठी जिल्ह्यात आयकरपात्र असल्याने अपात्र ठरलेले ४ हजार ५०९ शेतकरी अपात्र ठरले आहेत. त्यांच्याकडून ३ कोटी ८१ लाख ७० हजार रुपयांची वसुली करण्यात येणार आहे. यापैकी २ कोटी २० लाख २८ हजार रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे. तर १ कोटी ६१ लाख ४२ हजार रुपयांची वसुली प्रलंबित आहे.

याशिवाय जिल्ह्यातील २२ हजार १०९ शेतकरी इतर कारणांमुळे योजनेसाठी अपात्र ठरले आहेत. त्यांच्याकडून ७ कोटी ६५ लाख ६२ हजार रुपयांची रक्कम वसूल केली जाणार आहे. यापैकी ३४ लाख ५४ हजार रुपये वसूल करण्यात आले असून ७ कोटी ३१ लाख ०८ हजार रुपये वसूली प्रलंबित आहे. यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.

प्रशासनाने बजावलेल्या या नोटीसमुळे शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर आहे. यातील अनेकांना आपल्याला योजनेअंतर्गत का अपात्र ठरविण्यात आले याचीही माहिती नाही. आता या सक्तीच्या वसुलीने शेतकरी हैराण आहेत. आधीच करोनाचा प्रादुर्भाव, टाळेबंदी, निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टी यांसारख्या आपत्तींनी शेतकरी बेजार आहेत. अशात आता या सक्तीच्या वसुलीने त्यांच्या आर्थिक अडचणी अधिकच बिकट झाली आहे.

कृषी आयुक्तालय पुणे यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला पंतप्रधान किसान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती. यानुसार अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना संबंधित तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, सात दिवसांत शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत त्यांना मिळालेली रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

      अपात्रतेचे कारण       अपात्र शेतकरी         वसूल करण्यात येणारी रक्कम

      प्राप्तिकरपात्र शेतकरी        ४५०९                   ३ कोटी ८१ लाख ७० हजार

      इतर कारणांमुळे अपात्र       २२१०९            ७ कोटी ६५ लाख ६२ हजार

या योजनेत अनेक अपात्र लाभार्थ्यांचा समावेश झाला होता. यात आयकर भरणाऱ्या व्यक्तीचाही समावेश आहे. अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून दिलेली रक्कम वसूल केली जात आहे. २ कोटी ५४ लाख रुपयांची रक्कम आत्तापर्यंत अपात्र लाभार्थ्यांनी जमा केली आहे. सचिन शेजाळ, तहसीलदार, महसूल विभाग रायगड

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recovery of rs 11 crore from 26618 ineligible farmers in raigad zws
First published on: 22-04-2022 at 00:23 IST