वर्धा : हिंगणघाटच्या अंकिता जळीत कांड प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता टळली. अंकिताच्याच गावातील एका युवतीला ,’तुझी अंकिता करेन’, अशी धमकी देणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली.

अंकिताच्या दारोडा गावातील अठरा वर्षीय विद्यार्थिनी हिंगणघाटला महाविद्यालयात गेली असता तिला आरोपी प्रतीक गायधने याने भ्रमणध्वनीवरून, ‘तू माझा मोबाइल क्रमांक ब्लॅक लिस्टमध्ये का टाकला’, असा प्रश्न करीत दरडावले. त्यावर युवतीने बोलायचे नाही म्हणून फोन कट केला. आरोपीने पुन्हा फोन करून, ‘माझ्याशी बोलली नाही तर तुलाही अंकिताप्रमाणे ठार मारेन’, अशी धमकी दिली.

या प्रकारामुळे घाबरलेल्या युवतीने दारोडा गावाला जाण्यासाठी बसस्थानक गाठले. वडनेर येथे पोहचत नाही तोच आरोपी प्रतीक तिला बस स्थानकावर उभा दिसला. यावेळी त्याने अश्लील वर्तन करीत, ‘तुला तुझ्या आई-वडिलांसमोर घरातून उचलून नेतो’, अशी धमकी दिली. यानंतर युवतीने थेट वडनेर पोलीस स्थानक गाठले. युवतीने आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांनी तत्काळ पावले उचलत आरोपी प्रतीक गायधनेला अटक केली. पोलीस निरीक्षक कांचन पांडे पुढील तपास करीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उल्लेखनीय आहे की, राज्यभर गाजलेल्या प्रा. अंकिता जळीत कांड प्रकरणातील आरोपी विकेश यास काही महिन्यांपूर्वीच हिंगणघाट न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याच गावातील विद्यार्थिनीला परत धमकी मिळाल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.