राज्यात भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या असतानाच लातूर जिल्हय़ात कोणाला मंत्रिपद मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
निवडणुकीदरम्यान भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रत्येक मतदारसंघात ‘तुमचा आमदार नामदार होईल,’ असे जाहीर आश्वासन दिले. सहापकी निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकर व उदगीरमध्ये सुधाकर भालेराव हे दोन आमदार निवडून आले. हे दोघेही दावेदार आहेत. अहमदपूरचे अपक्ष आमदार विनायक पाटील यांनी सत्तास्थापनेत भाजपला साथ देणार असल्याचे जाहीर केले आहे. २००४ मध्ये विनायकरावांना अपक्ष असतानाही विलासराव देशमुख मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. या वेळी त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार का, याची अहमदपूरमध्ये चर्चा होत आहे. पाटील यांना लाल दिवा मिळाल्यास मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांची मात्र कुचंबणा होणार आहे. ज्यांच्या पराभवासाठी मेहनत घेतली, त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास पक्षाचा संघटनात्मक ढाचा कमकुवत राहण्याची शक्यता आहे. विनायकराव पाटील यांनी भाजपसोबत सरकारमध्ये राहावे. मात्र, त्यांना लाल दिवा मिळू नये, असे स्थानिक कार्यकर्त्यांना वाटते.
औसा मतदारसंघात पाशा पटेल पराभूत झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील बुलंद तोफ अशी त्यांची ओळख आहे. राज्यातील मुस्लिम चेहरा म्हणूनही त्यांना भाजपत ओळखले जाते. विधान परिषदेवर त्यांना पुन्हा घेतले जाईल व मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे. संभाजी पाटील निलंगेकर प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यामुळे त्यांना स्थान मिळेल, तसेच उदगीरचे सुधाकर भालेराव दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांचाही दावा प्रबळ आहे.
लाल दिवा नक्की कोणाला मिळणार? हे अर्थातच दिवाळीनंतर कळणार आहे. लातूरला ४० वर्षांंपासून कायम लाल दिवा मिळत आला आहे. २००९च्या मंत्रिमंडळात शेवटचे ४ महिने का होईना, अमित देशमुख यांना लाल दिवा मिळाला. जि. प. अध्यक्षपद निवडणुकीत देशमुख यांनी लातूर ग्रामीणमध्ये अडचण होऊ नये, या साठी शिवाजी पाटील कव्हेकर यांच्याशी राजकीय तडजोड करून त्यांच्या घरात लाल दिवा दिला. देशमुखांच्या घरचा लाल दिवा गेला असला, तरी त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत कव्हेकरांच्या दारात लाल दिवा पोहोचवला.
काँग्रेसमध्ये आता लाल दिवा येण्याची शक्यता नजिकच्या काळात नाही. भाजपच्या लाल दिव्यावरच सर्वाची मदार राहणार आहे. जिल्हय़ास कोणत्या का पक्षाचा असेना, लाल दिवा मिळणे आवश्यक ठरले आहे. विलासराव देशमुख यांच्या शब्दांत, ‘जेवण कोणाचेही असो, वाढप्या आपला असला पाहिजे’ असे सर्वाना सध्या वाटत आहे. वाढप्या कोणत्या का तालुक्याचा असेना तो आपल्या जिल्हय़ातील असावा, अशी आशा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Red fight motor for latur
First published on: 23-10-2014 at 01:40 IST