तानाजी काळे, लोकसत्ता

इंदापूर : पावसाळय़ाबरोबर निसर्गातील हिरवाईमध्ये दिसणारे मखमली सौंदर्य आता नष्ट होण्याच्या उंबरठय़ावर आहे. जमिनीची गुणवत्ता सुधारण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या मृगाचा किडा किंवा राणी किडय़ाला रासायनिक खते, कीटकनाशकांच्या बेसुमार वापरामुळे अधिवासाला फटका बसून त्यांचे दर्शन दुर्मीळ होऊ लागले आहे. यंदाही त्याचे अस्तित्व फारसे जाणवले नाही.

हा किडा जमिनीत एक विशिष्ट प्रकारचा स्राव सोडतो. त्यामुळे मातीला बुरशी लागत नाही. तसेच पालापाचोळा कुजण्याच्या प्रक्रियाला हातभार लावत त्याचे खत बनवून जमिनीची सुपीकता वाढवतो. हिवाळय़ाच्या सुरुवातीपासून हा किडा समाधी घेऊन थेट मृगाचा पाऊस झाला की पुन्हा अवतरतो. मात्र रासायनिक खते, कीटकनाशकांचा वाढता वापर, नष्ट होणारे गवताळ प्रदेश याचा फटका मृगाच्या किडय़ाला बसत आहे. या किडय़ाच्या संवर्धनासाठी प्रयत्न न झाल्यास त्याचा जैवविविधतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

महत्व काय?

शेती आणि पर्यावरणामध्ये या मखमली किडय़ाची उपयुक्त भूमिका आहे. लहान कीटक खाऊन जैविक कीड नियंत्रणाचे काम हा किडा करत असतो. नाकतोडय़ाची अंडी, पिकांची नासधूस करणाऱ्या अळय़ा कोषातून बाहेर आल्यावर हा किडा त्या फस्त  करतो. त्याशिवाय जमिनीची गुणवत्ता सुधारण्याचेही महत्त्वपूर्ण काम मृगाचा किडा करतो.

थोडी माहिती..

इंग्रजीत रेन बग किंवा ट्रोम्बिडीडाए प्रजातीतील रेड वेल्वेट माइट हा उपयुक्त कीटक मानला जातो. पावसाच्या आगमनानंतर निसर्ग हिरवा शालू पांघरतो, त्याबरोबरच हे लाल, मखमली किडे हिरव्या गवतात किंवा जमिनीवर दिसतात.

दर्शन दुर्मीळ..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाच्या सुरुवातीपासून या किडय़ाचे दर्शन होते. पावसाच्या सुरुवातीला दिसतो म्हणून या किडय़ाला मृगाचा किडा, राणी किडा किंवा खान्देशात गोसावी म्हटले जाते. मात्र गेल्या काही वर्षांत या किडय़ाचे दिसणे दुर्मीळ होत चालले आहे.