दिगंबर शिंदे

सांगली-मिरज राज्याची ‘वैद्यकीय पंढरी’ म्हणून ओळखली जाते. बाहेरगावचे लोक येथे उपचाराकरिता दाखल होत असत. पण करोनाकाळात ही वैद्यकीय पंढरी कसोटीचा सामना करण्यात यशस्वी झाली नाही.

जिल्हय़ात विशेषत: महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या एक महिन्यापासून करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागताच रुग्णालयांची व्यवस्था अपुरी पडत असल्याचे लक्षात आले. रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देण्याचे प्रकार आणि अवाजवी बिल आकारणीच्या तक्रारीही मोठय़ा प्रमाणात आहेत. तर काही इस्पितळ कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेस नकार दिल्याच्या घटना समोर आल्यानंतर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या तक्रारी असूनही प्रशासनाला त्याचे गांभीर्य वाटत नाही का, अशी शंका येण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र याच प्रशासनाने सुरुवातीच्या कामगिरीने राज्याचे लक्ष्य वेधून घेतले होते याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णांना उपचारासाठी खाटांची संख्या सध्या कमी पडत आहे हे वास्तव आहे. वाढत्या रुग्णांना योग्य आणि शासकीय योजनेतून उपचार होणे हीसुद्धा गरज आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करोनाग्रस्तांवर मोफत उपचार करण्याची सुविधा उपलब्ध असली तरी काही इस्पितळे या योजनेच्या बाहेर आहेत. सध्या शासकीय यंत्रणा अपुरी पडू लागताच महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातील काही रुग्णालये अधिग्रहित करून रुग्णांची सोय करण्यात आली असली तरी त्या ठिकाणी पैसे मोजावे लागत आहेत. अगोदरच करोनाची भीती असल्याने उपलब्ध असलेली खाट योजनेतील आहे की पैसे भरावे लागणार, यावर विचार करून निर्णय घेण्याची मानसिकता भांबावलेल्या स्थितीत असत नाही. अशा रुग्णाच्या मानसिकतेचा लाभ उठविण्याचे प्रयत्नही काही प्रमाणात झाले. अशा अवाजवी बिलाला चाप लावण्याचे काम प्रशासनप्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी करीत असले तरी ज्या रुग्णांची हेळसांड झाली त्याचे काय, असा प्रश्न येतोच.

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज

रुग्णालय उभे करणे म्हणजे केवळ एखादे गोदाम उभे करण्याइतपत सोपे नाही. यासाठी लागणारे मनुष्यबळ कसे उपलब्ध करणार याचे उत्तर मात्र दिले जात नाही. आहे त्या व्यवस्थेत मनुष्यबळाची उणीव भासत आहे. सांगली-मिरज शहराची वैद्यकीय पंढरी म्हणून ओळख आहे. मात्र करोना साथरोगामुळे या वैद्यकीय पंढरीची कसोटी लागली आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी प्राणवायूची गरज भासते. सध्या केवळ महापालिका क्षेत्रामध्ये कृत्रिम श्वसन यंत्रणेचे ६० संच आहेत, ते वाढविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी लागणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्गही अपुरा आहे. तो कसा तातडीने उपलब्ध होणार यावर प्रयत्न करण्याची गरज आहे. करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी प्रशिक्षित परिचारिकांची मोठी गरज आहे.

मिरजेतील सामान्य रुग्णालय कोविड रुग्णालयात रूपांतरित करण्यात आले. आता करोना नसलेल्या रुग्णांसाठी केवळ सांगलीचे सामान्य रुग्णालयच उपलब्ध आहे. तेथेही करोना वगळता अन्य उपचार करण्यास टाळाटाळ केली जाते. क्ष किरण, डायलेसिस, एमआरआय, विविध चाचण्या खासगीतून करून घेण्यास सांगितले जात आहे. या रुग्णालयावर आलेला ताण कमी करण्याची गरज आहे.

व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न

रुग्णांसाठी खाटा कमी पडत असल्याचे समोर येताच महापालिकेने स्वत:चे उपचार केंद्र सुरू करण्याचे ठरविले असून यासाठी जागेचा शोध संपला असून प्रत्यक्ष २०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचे कामही सुरू केले आहे. तर वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी १०० खाटांचे रुग्णालय उभे करण्यासाठी प्रस्ताव प्रशासनाला दिला आहे, याचबरोबर आमदार सुधीर गाडगीळ यांनी सामान्य रुग्णालयात आणखी २०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगितले. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सामान्य रुग्णालयात ४७ अतिरिक्त खाटा वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मंजूर करून घेतल्या आहेत, तर पालकमंत्री जयंत पाटील यांनी स्वातंत्र्यदिनी ४०० खाटांचे इस्पितळ उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे जाहीर केले.

महापालिका स्वत:चे कोविड रुग्णालय २० ऑगस्टपासून कोल्हापूर रोडवर सुरू करीत आहे. यासाठी आवश्यक प्रशिक्षित कर्मचारीही महापालिकेकडे उपलब्ध असून कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी महापालिका प्रशासन सक्षम आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

– स्मृती पाटील, उपायुक्त, सांगली महापालिका