शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे आश्वासन
पुण्यातील बालभारतीच्या दैनंदिन व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या सॅप यंत्रणेचा वापर हा काही कर्मचारी संघटनांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे होऊ शकला नाही, ही वस्तुस्थिती आहे. २००८ मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या काळात ही खरेदी झाली होती. तरीही बालभारतीच्या सर्व कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी या प्रकरणाची संबंधित अधिकाऱ्यांची प्राथमिक विभागीय चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत दिले.
प्रश्नोत्तराच्या तासात पुण्यातील बालभारतीच्या दैनंदिन व्यवहाराबाबत पारदर्शकता आणण्याबाबतचा प्रश्न अ‍ॅड. जयदेव गायकवाड यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना तावडे म्हणाले की, २००८ मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी सॅप संगणक प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मे. अ‍ॅड्रॉईड इन्फोटेक या संस्थेसमवेत सॅप खरेदीचा करार करण्यात आला होता. या यंत्रणेत १० कोटी रुपयांची २००८ मध्ये खरेदी करण्यात आली होती, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. सध्या सॅप प्रणाली कार्यान्वित झाली नसली तरी बालभारतीच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.
बदलत्या तंत्रज्ञानाचा विचार करून सॅप कार्यप्रणालीत असलेली बहुतांशी मॉडेल्स वेब पोर्टलच्या माध्यमातून या वर्षीपासून सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत सर्व जिल्ह्य़ांची मागणी नोंदविण्यात आल्याने पुरवठा नियोजन शक्य झाले आहे, तसेच पुरवठा वेळेत होण्यास मदत झाली आहे. बालभारतीचे कामकाज ‘ई बालभारती डॉट इन’ हे पोर्टल विकसित केले असून त्यांच्यामार्फत मंडळाने सर्व पुस्तके ई-बुक उपलब्ध करून दिली आहेत. तसेच
पुस्तकांची मागणीसुद्धा ऑनलाइन मागविण्याची सुविधा केली असून आगामी आर्थिक वर्षांत ग्राहकांना ऑनलाइन पैसे भरून पुस्तके घरपोच मिळतील.