लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : यंदाच्या प्रखर उन्हाळ्यात उजनी धरणातील असलेला मृत पाणीसाठा निम्म्यावर असताना सोलापूर शहरासह पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला भागाची पिण्याच्या पाण्याची निकड पाहून शुक्रवारी धरणातून भीमा नदीवाटे पाणी सोडण्यास प्रारंभ झाला. हे सोडलेले पाणी सोलापूरजवळील औज आणि चिंचपूर बंधाऱ्यांमध्ये पोहोचायला दहा दिवस लागतील.

सकाळी ९.३० वाजता १५०० क्युसेक विसर्गाने तर दुपारी अडीच वाजता २५०० क्युसेक विसर्गाने धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता विसर्ग सहा हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला, असे उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले.

आणखी वाचा-कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या भोवताली आंब्यांची आरास; अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने विशेष पूजा

यंदाच्या वर्षी उजनी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती शोचनीय आहे. मागील पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे धरणात ऑक्टोंबरपर्यंत ६०.६६ टक्क्यांपर्यत पाणीसाठा होणे शक्य झाले होते. परंतु त्यानंतर धरणातील पाणी वाटप नियोजन कोलमडल्यामुळे हिवाळ्यातच म्हणजेजानेवारी महिन्यातच धरणातील पाणीसाठी मृत साठ्यात आला होता. धरणात ६३ टीएमसीपर्यंत पाणीसाठा आलि तर तो मृत साठा मानला जातो. या मृत साठ्यातील पाणी शेती वा उद्योगासाठी वापरता येत नाही. तर केवळ पिण्यासाठी राखीव असते. सध्या धरणात जेमतेम वजा ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक असतानाच सोलापूरसह पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोल्याची तहान भागविण्यासाठी तीव्र निकड पाहून उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणात येत्या दहा दिवसांत पाणीसाठा वजा ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत खालावण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.