छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात बांधण्यापेक्षा इतिहासाची साक्ष देणारे जलदुर्ग, गड, किल्ल्यांना नवसंजीवनी द्यावी, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवगड येथे म्हटले आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कोकण दौरा सुरू आहे. ते आज देवगडमध्ये दाखल झाले. त्यांनी देव कुणकेश्वर (देवगड) मंदिरात जाऊन अभिषेक केला. त्यानंतर आंबा बागायतदारांसह विविध शिष्टमंडळाशी चर्चा केली.
लोकांच्या गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. निवडणुकांवर डोळा ठेवून लोकांना गाजर दाखविले जात आहेत, पण सामान्य जनतेच्या प्रश्नाचे सरकारला देणे घेणे नाही, असे पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले. परप्रांतीयांची संख्या वाढत आहे. ही बाब चिंतेची असली तरी सत्ता आमच्या हाती दिली तर परप्रांतीयांची इकडे येण्याची हिंमत होणार नाही, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात उभारले जात आहे. हे स्मारक बांधण्यापेक्षा इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड, किल्ले, जलदुर्गाना नवसंजीवनी द्यावी, असे राज ठाकरे म्हणाले. छत्रपतींचा इतिहासाला नवसंजीवनी देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. टोलला विरोध नाही देवगड तालुक्याचा दौरा आटोपून राज ठाकरे रात्री कणकवलीत दाखल झाले. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, टोलमध्ये पारदर्शकता नाही. परदेशात टोलचे पैसे शासनाच्या तिजोरीत जमा होतात, पण महाराष्ट्रात टोलचे पैसे कोणाच्या तिजोरीत जमा होतात हा प्रश्न आहे. आमचा टोलला विरोध नाही, पण टोलमध्ये पारदर्शकता हवी, असे राज ठाकरे म्हणाले.
या वेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या सिंधुदुर्गातील चौपदरीकरणाच्या भूसंपादनाचा प्रश्न घेऊन कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. कणकवलीत अ‍ॅड्. उमेश सावंत यांनी कोकणचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले.
या दौऱ्यात मनसे कोकण संघटक माजी आमदार परशुराम उपरकर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी माजी आमदार नितीन सरदेसाई, अ‍ॅड्. आदित्य शिरोडकर, अविनाश अभ्यंकर यांच्यासह अनेक पदाधिकारी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renovate forts in maharashtra instead of creating monument says raj thackeray
First published on: 25-06-2015 at 07:21 IST