संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी परिसरात असलेल्या गरम पाण्याच्या झऱ्यांपासून वीज निर्मितीच्या प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्य़ातील राजवाडी गावात (ता. संगमेश्वर) संशोधन सुरू झाले आहे. या झऱ्यांच्या पाण्यातील उष्णतेचा वापर करुन वीजनिर्मितीचा देशातला हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रयोगासाठी पुण्याची थरमॅक्स कंपनी आणि राजवाडी ग्रामपंचायत यांच्या एका अनौपचारिक समारंभात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष डॉ. आर. आर. सोंडे आणि राजवाडीचे सरपंच श्री. संतोष भडवळकर यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
देशात अनेक ठिकाणी गरम पाण्याचे झरे आढळतात. मात्र त्यावर ऊर्जानिर्मितीच्या दृष्टीने संशोधन झालेले नाही. जगातील २४ देशांमध्ये अशा प्रकारच्या गरम पाण्याची उष्णता वापरून वीज निर्मिती गेली सुमारे १०० वर्षे चालू आहे. म्हणून राज्य सरकारच्या पुढाकाराने थरमॅक्स कंपनीने या संशोधनासाठी रस दाखवला. त्यानुसार गेल्या वर्षी कंपनीने महाराष्ट्र ऊर्जा निर्मिती प्राधिकरणाबरोबर करार केला आहे. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली ते राजापूर या पट्टय़ात निरनिराळ्या ठिकाणी आढळणाऱ्या गरम पाण्याच्या झऱ्यांचे रासायनिक पृथक्करण कंपनीच्या संशोधक चमूने केले. मुंबईच्या भाभा अणू संशोधन केंद्राचेही यासाठी सहकार्य घेण्यात आले. आइसलँड या देशात अशा प्रकारच्या वीज निर्मितीचे तंत्रज्ञान विशेष विकसित झाले आहे. म्हणून त्या देशातील आर.जी. कंपनीबरोबर थरमॅक्सने तांत्रिक सहकार्याचा करार केला आहे. विविध चाचण्यांच्या आधारे दोन्ही कंपन्यांच्या शास्त्रज्ञांनी संगमेश्वर तालुक्यातील तुरळ-राजवाडी या गावांमध्ये असलेल्या गरम पाण्याच्या झऱ्याच्या परिसरात अपेक्षित वीज निर्मितीसाठी सर्वात जास्त अनुकूल स्थिती असल्याचा अभिप्राय दिला. त्या आधारे गेल्या शनिवारपासून राजवाडी गावातील ब्राह्मणवाडीमध्ये प्रत्यक्ष चाचण्यांना सुरुवात झाली आहे. त्याप्रमाणे संध्याकाळी या संशोधनाबाबतच्या सामंजस्य करारावर सह्य़ा करण्यात आल्या. थरमॅक्सच्या संशोधक चमूसह राजवाडीचे ग्रामस्थ या प्रसंगी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. भूगर्भातील गरम पाण्याच्या उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती होणार असल्यामुळे संभाव्य क्षेत्रात खोलवर खोदकाम करून विविध चाचण्यांद्वारे निरीक्षणे नोंदवण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या निष्कर्षांवर पुढील प्रक्रिया अवलंबून राहणार आहे. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाल्यास भू-औष्णिक वीज निर्मिती करणाऱ्या देशांच्या यादीत भारत हा २५वा देश ठरणार आहे. तसेच तुरळ-राजवाडी ही कोकणातील गावे या क्षेत्रात राष्ट्रीय नकाशावर चमकणार आहेत. सुरुवातीला या संशोधनात्मक प्रकल्पातून ३ मेगाव्ॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या संदर्भात बोलताना थरमॅक्सचे कार्यकारी उपाध्यक्ष सोंडे यांनी सांगितले की सौर ऊर्जेसारखाच हा अतिशय शुद्ध ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. त्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही. तसेच परिसरातील सध्याच्या गरम पाण्याच्या झऱ्यांच्या साठय़ांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.