अकोले : आदिवासी समाजाच्या प्रश्नासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. पर्यावरण रक्षणाचे जल, जंगल, जमीन संरक्षणाचे काम आदिवासी समाजानेच केले आहे, असे सांगतानाच आदिवासी समाजाच्या ताटातले काढून दुसऱ्याला देण्याचे काम सरकार कधीही करणार नाही, असे सांगत आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त डॉ. जालिंदर भोर होते. आमदार अमोल खताळ व आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पदे येतात, जातात, पुन्हा येतात पण ‘लाडका भाऊ’ म्हणून मला जी ओळख मिळाली ते सर्वांत मोठे पद आहे, असे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले, कोणी कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना कदापिही बंद होणार नाही. महायुतीचे हे सरकार शब्द पाळणारे सरकार आहे. त्यामुळे दिलेली सर्व आश्वासने टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील.
मारुती मेंगाळ यांनी आदिवासींच्या प्रश्नांचा आढावा घेतला. बाळासाहेब भोर यांनी स्वागत केले. शर्मिला येवले यांनी आभार मानले.
भांगरे व ठाकर स्मारकासाठी निधी देऊ
अकोले तालुक्यासाठी २ हजार कोटी रुपये देणारा मी मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. आदिवासी समाजाला सशक्त करण्याचा विडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचलला आहे. समाजासाठी विविध योजना सुरू केल्या. राष्ट्रपतीसारखे सर्वोच्च पद दिले. बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस जनजाती गौरव दिन म्हणून सुरू केला. आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे व राया ठाकर यांच्या स्मारकांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
उपमुख्यमंत्र्यांना महिलांनी राख्या बांधल्या
रक्षाबंधनामुळे महिलांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना राख्या बांधल्या. लव्हाळवाडी येथील महिलांनी पारंपरिक आदिवासी महिला नृत्य सादर केले. शिंदे यांनी व्यासपीठावरून खाली येत या कलाकारांचा सत्कार केला. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.