लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड हे एकीकडे उमेदवारी अर्ज भरत असताना दुसरीकडे या पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी जिल्हाध्यक्षपदासह पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पक्षाला धक्का बसला आहे.
पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः आपणांस राजीनामा देण्याबाबत निरोप पाठविल्यामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे गायकवाड यांनी सांगितले. मात्र राजीनामा देण्यास का सांगितले, याचे कारण आपणांस समजले नाही. सोलापूर जिल्ह्यात आपण दोन हजार बूथ कमिट्यांसह सहाशे शाखा उभारल्या होत्या. या कामाची कदर पक्षश्रेष्ठींनी केली नाही, याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली.
सोलापूर लोकसभेसाठी राहुल गायकवाड (अक्कलकोट) आणि माढा लोकसभेसाठी रमेश बारसकर (मोहोळ) यांना वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली होती. या दोन्ही उमेदवारांनी सोमवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करीत असतानाच दुसरीकडे पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांना पदावरून पायउतार होताना पक्षसदस्यत्वही सोडावे लागले.