सततच्या आगींमुळे भोयदापाडय़ातील नागरिकांना श्वसनाचे विकार; जलस्रोतही दूषित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसेनजीत इंगळे, विरार

वसई तालुक्यातील कचराभूमीची समस्या अधिक जटील होत आहे. कचराभूमीमुळे भोयादापाडा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचराभूमीला सतत आगी लागत असल्याने नागरिकांचा श्वास धुरामुळे कोंडत आहे.

भोयादापाडय़ात श्वसनाच्या आजाराने ग्रस्त असलेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या भागातील काही दवाखान्यांमध्ये हल्ली काही जण खोकल्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. भोयादापाडय़ातील वातावरणात धुराचा मारा होत असतो. त्यामुळे कचराभूमीला लागणाऱ्या आगी पालिकेने नियंत्रणात आणण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

कचराभुमीवरील आगी आटोक्यात आणण्यास  महापालिका कोणत्याही उपाययोजना करीत नाही.  या विभागातील पाण्याचे नैसर्गिक  साठे  कचराभूमीतील पाणी झिरपून आल्याने दूषित झाले आहेत. त्यामुळे अनेक भागांत पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. या ठिकाणी कूपनलिकांमधील पाण्यालाही दुर्गंधी येत असल्याने नागरिकांना आता दूषित हवेसह पाण्याचाही सामना करावा लागत आहे.

भोईदापाडा परिसरातील कचराभूमीवर रोज शहरातील ६५० टन कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. यामुळे कचऱ्याचा मोठा डोंगरच उभा राहिला आहे. मिथेन वायुमुळे या कचऱ्याला सतत आगी लागतात.  महापालिका केवळ पाणी मारून ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असते. पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. रात्रीच्या वेळी कचऱ्याला लागलेली आग अधिक पसरत जाते. त्यामुळे काही वेळातच आजूबाजूचा संपूर्ण परिसर धुराने व्यापला जातो. यामुळे यथील नागरिकांना श्वास घेता येत नाही.

मध्यंतरी महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्चून  कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प आणला होता. पण २०१३ साली आग लागल्याने हा प्रकल्प बंद पडला. तो आजतागायत या ठिकाणी कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया  न करता कचरा टाकला जात आहे.

यामुळे केवळ मागील पाच वर्षांत लाखो टन कचरा येथे जमा झाला आहे. यामुळे या परिसरात पर्यावरणाची मोठी हानी झाली आहे. या परिसरातील संपूर्ण नैसर्गिक पाणवठय़ांची गटारगंगा झाली आहे.

औद्योगिक परिसरात हजारो कामगार येतात.  सततच्या धूर आणि प्रदूषित वातावरणाचा त्यांना त्रास होत असतो. काहींना श्वसनाचे विकार, खोकला, सर्दी आणि त्वचा विकाराचा सामना करावा लागत असल्याची माहिती स्थानिक कारखाना मालक आर. एन. पटेल यांनी दिली. भोयदापाडा, सातिवली, राजावली, वालीवच्या आसपासचा संपूर्ण परिसर या कचराभूमीमुले बाधित झाल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी केली.

या परिसरात तीन जिल्हा परिषद आणि १२ खासगी शाळा आहेत. या शाळेत हजारो विद्यार्थी शिकत आहेत. कचराभूमीला लागणाऱ्या आगीमुळे या शाळांचा परिसर धुराने व्यापलेला असतो. विद्यार्थ्यांमध्ये खोकला, उलटय़ांचा त्रास, घसा खवखवणे अशा समस्या जाणवत सतावत आहेत.

नव्याने नळजोडणी

आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिका उपाययोजना करत असल्याचे पालिकेने सांगितले.  तसेच लवकरच या विभागात आरोग्य विभागातर्फे एक पथक पाठवून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जाईल, तसेच ज्या परिसरात दूषित पाणी पुरवठा होत आहे त्या परिसरात नव्याने नळजोडणी केली जाईल , अशी माहिती पालिका अभियंता माधव जवादे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Respiratory disorders to citizens due to smoke from dumping ground zws
First published on: 01-01-2020 at 03:20 IST