सोलापूर : केंद्रातील मोदी सरकारच्या जनता आणि कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सिट) आणि केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या देशव्यापी संपाला सोलापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बुधवारी बहुसंख्य कारखाने साप्ताहिक सुटीनिमित्त बंद होते.
संपाबरोबर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. महावितरणच्या जुनी मिल आवारात, सोलापूर मंडल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सोलापूर महापालिकेतही आंदोलन झाले असता, पोलिसांनी लगेच आंदोलकांची धरपकड सुरू केली. सरकारी कर्मचारी संघटनाही आंदोलनात उतरल्या होत्या.
जुनी मिल आवारात महावितरणच्या सोलापूर मंडल कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात सिटूचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांनी, महावितरणकडून जुने उपयुक्त वीजमीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती वीजग्राहकांवर केली जात असल्याचा आरोप करीत, त्या विरोधात आक्रमक शैलीत शासनाचा समाचार घेतला. स्मार्ट वीज मीटरची सक्ती न थांबविल्यास सोलापुरात मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात दाऊद शेख, नरेश दुगाणे, वीरेंद्र पद्मा, विजय हरसुरे, बाळकृष्ण मल्याळम, पांडुरंग म्हेत्रे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. परंतु आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलक विल्यम ससाणे, रफिक काझी, बापू साबळे, वसीम देशमुख यांना ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवले. परंतु तरीही रास्ता रोको झाला. यात युसूफ शेख, विक्रम कलबुर्गी, अप्पाशा चांगले, नरेश गुल्लापल्ली, योगेश हकीम, अफसाना बेग, फातिमा बेग, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, निलोफर शेख, आरिफा शेख, नागमणी दंडगल, प्रभाकर गेंट्याल, सुरेश गुजरे, वसीम मुल्ला आदींचा सहभाग होता.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात एम. एच. शेख, अशोक इंदापुरे, शेवंता देशमुख, सिद्धाराम उमराणी, म. हनीफ सातखेड, लिंगव्वा सोलापुरे, किशोर मेहता, रमेश बाबू, अरुण सामल, बाबू कोकणे, ज्योती उराडे, रुपाली दोरकर व इतर आंदोलक सहभागी झाले होते.
या आंदोलनात शंतनू गायकवाड, रवी नष्टे (महसूल), अमृत कोकाटे (राज्य सरकारी कर्मचारी), बापू सदाफुले, जनार्दन शिंदे (सोलापूर महानगरपालिका कर्मचारी), बाली मंडेपु (सफाई मजदूर), वसंत खेडकर, ज्योतीराम शिंदे (पाटबंधारे), दिनेश बनसोडे (जिल्हा परिषद), पुष्पा पाटील (आशा व गटप्रवर्तक), व्यंकटेश कोंगारी, नसीमा शेख, मुरलीधर सुंचू (विडी कामगार युनियन) यांच्यासह विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी उतरले होते. सोलापूर महापालिकेत झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व अनिल वासम यांनी केले.