जिल्हा प्रशासनाने करोना रूग्ण आढळल्यानंतर जाहीर केलेले प्रतिबंधित क्षेत्र हे सर्वसामान्य नागरिक, फळ, भाजीपाला व दूध विक्रेत्यांसाठीच लागू असल्याचे धक्कादायक चित्र पालघर जिल्ह्यात दिसून आले आहे. 16 एप्रिल पासून सफाळे येथे प्रतिबंधक क्षेत्र घोषित असताना या गावातील शेकडो नागरिक वसई- विरार, मिरा- भाईंदर व बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेसाठी दररोज प्रवास करीत असल्याचे दिसून आले होते. त्यापैकी एका व्यक्तीला करोना संसर्ग झाल्याचे उघडकीस आल्याने प्रतिबंधित क्षेत्र हे फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच लागू राहील असे दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर तालुक्यातील सफाळे मिरानगर येथील ५५ वर्षीय व्यक्तीला सर्वेक्षणात SARI/ILI लक्षणे आढळल्याने रुग्णाची करोना चाचणी केली असता त्याला आजाराचा संसर्ग असल्याचे आढळून आले. ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेत वाहन चालक पदावर कार्यरत असून प्रतिबंधीत क्षेत्र घोषित झाल्यानंतर देखील हे चालक स्वतःच्या दुचाकीवरून प्रतिबंधीत क्षेत्रातून दररोज एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत मुंबईला ये-जा करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

सफाळे येथून एसटी महामंडळाच्या सकाळी सुटणाऱ्या एका बस मधून तब्बल 55- 60 प्रवासी मुंबईच्या दिशेने जात असत. त्याचप्रमाणे बेस्ट व वसई-विरार महानगरपालिकेच्या काही बस गाड्या सफाळा येथील त्यांच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी दररोज येत असत.

सर्वसामान्य माणसाला तसेच भाजीपाला, फळ व दूध विक्री करणाऱ्या नागरिकांना किंवा सफाळा पश्चिमेकडील गावातील व्यक्तीना पूर्वेच्या भागात जाण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातून प्रवास करण्यास मज्जाव केला जात असताना, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने दिलेली सूट जिल्ह्यात करोना संसर्ग वाढीस कारणीभूत ठरत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठवड्यापासून ग्रामस्थांनी एकत्रित होऊन कर्मचाऱ्यांना ने- आण करण्यासाठी येणाऱ्या बसगाड्या रोखल्या होत्या. तरीही या परिसरातील तीनशे ते चारशे व्यक्ती दुचाकीवरून विविध ठिकाणी अत्यावश्यक सेवेसाठी जात असल्याची माहिती पुढे आली आहे. एकीकडे सर्वसामान्य माणूस टाळेबंदी व इतर शासकीय सूचनांचे पालन करत असताना प्रशासन अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी दुजाभाव करून देत असलेल्या सूट मुळे वाढणाऱ्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येच्या अनुषंगाने सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी 28 एप्रिल रोजी सर्व प्रकारच्या नागरिकांसाठी जिल्हाबंदीची काटेकोर अंमलबजावणी व्हावी याकरिता आदेश निर्गमित केले असले तरीही आदेश कागदावरच राहिल्याचे पालघर जिल्ह्यात दिसून येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Restricted area for general public only msr
First published on: 09-05-2020 at 10:10 IST