कराड : सध्या आवाजाच्या भिंतींचा जीवघेणा कहर गाजत असताना, त्या विरोधात रेठरे बुद्रुक (ता. कराड़) येथील ग्रामस्थांनी त्यास एकमुखाने विरोध केला असून, डीजे अणि दारूला रेठरे बुद्रुकमधून हद्दपार केले आहे. रेठरे बुद्रुकच्या आयोजित ग्रामसभेत डीजे आणि दारू या दोन घाणेरड्या विषयांवर समस्त गावकर्यांकडून आवाज उठवण्यात आला आणि डीजे, दारुबंदी व सध्याचे स्मार्ट मीटर न बदलण्याचा ठराव एकमताने करण्यात आला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत आहे.
ग्रामसभेत सरपंच हणमंत सूर्यवंशी म्हणाले, की आपल्या गावचे सुपुत्र आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी, आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या माध्यमातून रेठरे बुद्रुकचा सुनियोजित विकास होत आहे. लोकांना जे अपेक्षित आहे ते करण्यासाठी आपण सर्वजण तत्पर आहोत. गावातील शांतता बिघडू नये यासाठी ग्रामस्थांच्या हिताला रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्राधान्य देण्यात आले आहे. आणि पुढेही ते देण्यात येईल.
दरम्यान, ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावात यापुढे आवाजाच्या भिंती (डीजे), दारूबंदी व सध्याचे मीटर न बदलण्याचा ठराव एकमताने करण्यात आला आहे. या ऐतिहासिक ग्रामसभेला सरपंच हणमंत सूर्यवंशी, उपसरपंच भाग्यश्री पवार, तंटामुक्ती गाव अभियानाचे अध्यक्ष आबा मोहिते, ग्रामसेवक एस. एस. होलमुखे, सनी मोहिते, तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
गावात दारूबंदी झाली पाहिजे. शिवाय डीजेसारख्या आवाजाने लोकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत ते बंद झाले पाहिजे, अशी जोरदार मागणी या वेळी अशोक जाधव, श्रीकृष्ण कुलकर्णी, ओंकार चव्हाण, धैर्यशील मोहिते, माजी सरपंच सुवर्णाताई कापूरकर, विनायक धर्मे आदींनी केली. तसा ठरावही ग्रामपंचायतीकडून या वेळी करण्यात आला. तसेच सन १९४० ते २०२५ पासूनचे रेठरे बुद्रुक गावचे आजी माजी सरपंच यांच्या हस्ते वृक्षारोपण करावे, असे सनी मोहिते यांनी केलेल्या सूचनांची दखल घेऊन रेठरे बुद्रुक गावचे आजी माजी सरपंच यांच्या हस्ते वृक्षारोपण वृक्षारोपण करण्यात आले. आजी-माजी सैनिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य विभाग, वीजजोडणी कारागिरी (वायरमन), अंगणवाडी सेविकांचा सत्कार ग्रामसभेत करण्यात आला. ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चाही करण्यात आली.
दरम्यान, सध्या आवाजाच्या भिंतींचा जीवघेणा कहर गाजत असताना, त्या विरोधात रेठरे बुद्रुक (ता. कराड़) येथील ग्रामस्थांनी त्यास एकमुखाने विरोध केला असून, डीजे अणि दारूला रेठरे बुद्रुकमधून हद्दपार केल्याचे सर्वत्र स्वागत होत असून, याचे अनुकरण अन्य गावांनीही करावे अशी अपेक्षा सजग नागरिकांमधून व्यक्त होत आहे.