या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाई : कुस्ती खेळणाऱ्यांना फक्त मदत करून चालणार नाही तर ज्यांनी आपले आयुष्य कुस्तीसाठी घालवले अशा सेवानिवृत्त कुस्तीगिरांना मदत शासनाने केली पाहिजे. त्यांना पद दिले गेले पाहिजे. शासनाला हा निर्णय घ्यायला लागणार आहे, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, यावेळी कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, सातारा तालिम संघाचे संस्थापक साहेबरावभाऊ पवार, धनाजी फडतरे, अमोल बुचडे, बलभीम शिंगरे, दीपक पवार, संदीप साळुंखे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. सर्व मल्लांनी खिलाडूवृत्तीने मैदान गाजवावे, असे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी केले.

कुस्ती स्पर्धेच्या अनुषंगाने साताऱ्यातील शाहू स्टेडियमला वेगळी झळाळी आली आहे. आज उदघाटना दिवशी ५७, ७० आणि ९२ किलो वजनी गटातील कुस्त्या करून सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शुभारंभाच्या कुस्त्या लावण्यात आल्या. सुधीर पवार यांनी प्रास्ताविक केले. या आखाडय़ात राज्यभरातून ९०० मल्ल, ११० प्रशिक्षक पंच सहभागी होणार आहेत.या स्पर्धेसाठी राज्यभरातून कुस्ती शौकिन उपस्थित राहतील असे सांगण्यात आले.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा साताऱ्यात व्हावी, अशी ज्येष्ठ नेते शरद पवारांची इच्छा होती आणि त्यांच्या आग्रहावरून साताऱ्याला ही स्पर्धा होत आहे. शंभूराज देसाई म्हणाले, ‘‘महाराष्ट्र केसरी स्पर्धा १९६२मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर आता पवारांमुळे सातारा जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे. डोळय़ांचे पारणे फिटेल अशा कुस्त्या पहायला मिळणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्यावतीने संपूर्ण सहकार्य या स्पर्धेला राहील.’’ ‘‘जिथे प्रशिक्षक नाही, तिथे तालीम नाही. मी हे अधिवेशन सगळय़ांच्या सहकार्याने पार पाडेन,’’ असे साहेबराव पवार यांनी सांगितले. सुधीर पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर बाळासाहेब लांडगे यांनी आभार प्रदर्शन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retired wrestlers inauguration maharashtra kesari wrestling tournament ysh
First published on: 06-04-2022 at 00:39 IST