सांगली : महापालिकेने जिल्हा रुग्णालयासमोर व्यावसायिकांनी केलेेले अतिक्रमण हटविल्याने रस्ता खुला झाला आहे. रुग्णाबरोबरच नातेवाइकांची वर्दळ असलेला हा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्याची वारंवार मागणी होत होती. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने अखेर याकडे लक्ष देत हा रस्ता शुक्रवारी अतिक्रमणमुक्त केला.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारालगत आणि समोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले होते. महापालिकेने काही खोक्यांचे या ठिकाणी पुनर्वसन केले असून ही जागा ताब्यात असताना काही खोकेधारकांनी खोक्यापुढे सार्वजनिक रस्त्यावरच ठाण मांडले होते. याशिवाय अनधिकृत हातगाडे, फळविक्रेते यांनीही रस्त्यावरच व्यवसाय थाटल्याने रुग्णवाहिका रुग्णालयात जाण्यासाठी बऱ्याचवेळा अडथळा निर्माण होत होता. तसेच रुग्णांच्या नातेवाइकांनाही या अतिक्रमणाचा त्रास होत होता. हे अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी वारंवार करण्यात येत होती.
अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त वैभव साबळे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन पथकाचे कार्यकारी अधिकारी दिलीप घोरपडे, विक्रम घाडगे आणि पथकाने जिल्हा रुग्णालय ते गारपीर चौक हा मार्ग अतिक्रमणमुक्त केला. या मार्गावर दुतर्फा असणाऱ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बोर्ड हातघडे टेबल खुर्च्या रस्त्यावरच मांडून अतिक्रमण केले होते. अतिक्रमण निर्मूलन विभागाने रुग्णालयापासून गारपीर चौक या मार्गावर असणाऱ्या खोक्यांच्या समोरील अतिक्रमणे हटवत रस्त्यावर असणारे साहित्यही जप्त केले आहे.
अतिक्रमण विभागाच्या या कारवाईमुळे आता हा मार्ग वाहतूक या दृष्टीने मोकळा झाला आहे. वैद्यकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या या मार्गावर यापुढे कोणताही अतिक्रमण होणार नाही याबाबत महापालिका प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक, वाहनधारक व्यक्त करत आहेत.