सातारा : ऐन गणेशोत्सवात शहराचे उपनगर कृष्णानगर परिसरातील छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोर प्रतापसिंह नगरकडे जाणाऱ्या मार्गावर एका महिलेला दोघांनी कोयत्याचा धाक दाखवून दीड तोळ्याचे मंगळसूत्र लुबाडल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. सातारा उपनगरातील या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. या घटनेचे वृत्त समाज माध्यमांवरून पसरताच या घटनेची गंभीर दखल पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी घेत तपासाचे आदेश दिले आहेत.

भयभीत झालेल्या महिलाने जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करत पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणामुळे सातारा शहर पोलिसांसमोर पुन्हा एकदा आव्हान उभे राहिले आहे.

सातारा शहरातील प्रतापसिंह नगर रस्त्याला हार्मनी पार्क येथे सदरची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलांना लक्ष करत दोन अज्ञात इसम दुचाकीवरून आले. वैद्यकीय महाविद्यालयसमोर एका महिलेला कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यात आले. सोनाली दीपक लोंढे असे महिलेचे नाव असून, तिच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

दुचाकीवरील दोघांनी तिथून पलायन केले. जीव वाचवण्याच्या भीतीने महिलेने संरक्षक दरवाजा (गेट)वरून उडी मारून इतर महिलांसह पळ काढला. या घटनेचे वृत्त समाज माध्यमांवरून पसरताच या घटनेची गंभीर दखल पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी घेतली. त्यांच्या निर्देशाप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला पाचारण केले व यासंदर्भात तातडीने तपासाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रताप सिंह नगरामध्ये सातारा शहर पोलिसांनी संबंधित संशयितांचा शोध सुरू केला असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सांगितले. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून येऊन अज्ञाताकडून तोडून नेले जात असल्याच्या घटना सातारा शहरात सातत्याने घडत आहेत. विलासपूर येथेही काही दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शहर गुन्हे प्रकटीकरण विभाग सतर्क झाले आहेत.