सांगली : अज्ञात सहा जणांनी मध्यरात्री घरात शिरून दगडाने मारण्याची धमकी देत अडीच लाखाची रोकड आणि मुलीकडे असलेले १५ तोळे सोन्याचे दागिन्याची लूट करण्याचा प्रकार कवठेपिरान (ता. मिरज) येथे घडला. या प्रकरणी गुरूवारी सकाळी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, कवठेपिरान येथे सांगली रस्त्यावर रफिक दस्तगीर मगदूम यांचे घर आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने ते शेजारी राहतात. आज मध्यरात्री अज्ञात चौघेजण घरात शिरले. दगडाने ठेचून मारण्याची धमकी देत घरात बांधकामासाठी ठेवलेली अडीच लाखाची रोकड आणि मुलगी तरन्नूम मुजावर हिचे तिजोरीत ठेवलेले १५ तोळे सोन्याचे दागिने घेउन पोबारा केला. मुलगी तरन्नूम ही विवाहित असून नातलगाच्या लग्नासाठी ती माहेरी आली होती.
या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपअधिक्षक प्रणील गिल्हा, पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देउन दरोडेखोरांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. शोधासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली. मात्र, फारसे हाती काही लागले नाही. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस पथके नियुक्त करण्यात आल्याची माहिती निरीक्षक गायकवाड यांनी दिली.