जुलै महिन्यात अजित पवार यांच्यासह ९ आमदारांचा एक गट शिंदे-फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील झाला. सरकारमध्ये सामील झाल्यानंतर ९ आमदारांना वजनदार खाती मिळाली आहेत. अजित पवारांना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद मिळालं आहे. अलीकडेच चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी अजित पवारांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. पण, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी निधीवाटपावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे.
अर्थमंत्री अजित पवार आहेत. पण, रूग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीसांनी दिल्यात. हा अजित पवारांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार आहे. मात्र, तो योग्य नाही, असा हल्लाबोल रोहित पवारांनी फडणवीसांवर केला आहे.
“अजित पवारांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार योग्य नाही”
‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर रोहित पवार म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचं काम अर्धवट होऊन निधीअभावी ठप्प झालंय.. अर्थमंत्री अजितदादा आहेत, मात्र या रुग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीस साहेब आपण दिल्यात. हा आपल्या समकक्ष असलेल्या अजितदादांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार असून तो योग्य वाटत नाही.”
हेही वाचा : भाजपा-शिवसेना युतीबद्दल काय वाटतं? नितीन गडकरींचं मजेशीर उत्तर, प्रेक्षकही खळखळून हसले!
“दुसरं म्हणजे उपचाराअभावी एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी आपण आणि आरोग्यमंत्री घेणार का?” असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : शरद पवारांची न आवडणारी गोष्ट कोणती? रोहित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले, “ते उघड-उघड…”
“१ रूपयांचाही निधी दिलेला नाही”
“राजकारण तर आपण नेहमीच एकमेकांच्या विरोधात करतो. पण, ते विचारांचं आणि तत्त्वांचं असावं. राजकारणापायी सामान्य माणूस भरडला जाऊ नये, हे आपल्यासारख्या मोठ्या नेत्याला सांगण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैव ते काय! हे शेअर केलेले फोटो बघितले तर इतकं काम होऊनही १ रुपयाही निधी दिलेला नाही आणि अशीच अवस्था राज्यातील इतर २६ कामांचीही आहे. मायबाप सरकार हे आपल्याला तरी योग्य वाटतं का?” असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला.