Rohit Pawar criticize Ajit Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. भाजपाच्या खासदार कंगणा रणौत यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला होता. ज्याचे फोटो कंगना रणौत यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. दरम्यान राष्ट्रावादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी यावर प्रतिक्रिया देताना वेगळीच शक्यता बोलून दाखवली आहे. कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी कोणाचा दबाव असू शकतो असे रोहित पवार म्हणाले आहेत. याबरोबरच ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
रोहित पवारांची टीका
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यावरून अजित पवारांच्या पक्षावर टीका केली आहे. एकीकडे पुरोगामी विचारांचा दाखला द्यायाचा आणि दुसरीकडे आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी हे दुटप्पी भूमिका असल्याचे रोहित पवार म्हणाले आहे.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, “जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती, हे आरएसएसच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे. सत्तेत ते गेलेत, त्याची कारणं वेगळी आहेत. पण तिथं गेल्यानंतर त्यांचे विचार काही त्यांनी स्वीकारले नसतील. पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल की एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊद्या… म्हणजे हे आरएसएसचा विचार स्वीकारत असल्याचा संदेश जातो. एकाबाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एकाबाजूला चव्हाण साहेबांचे, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे आरएसएसच्या बैठकीला तुम्ही किंवा तुमचे प्रतिनिधी जात असतील, तर ही दुटप्पी भूमिका आहे आणि आज राजकारणात लोकांना दुटप्पी भूमिका नकोय,” असे रोहित पवार म्हणाले.
कंगना रणौत यांची पोस्ट
भाजपाच्या खासदार कंगना रणौत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो त्यांच्या घरी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचे आहेत आणि यामध्ये खासदार सुनेत्रा पवार यादेखील दिसत आहेत. “आज माझ्या घरी राष्ट्र सेविका समिती महिला शाखेचे आयोजन केले होते. आपण सर्वजण एकत्र येऊन सनातन मुल्य, हिंदु संस्कृती आणि राष्ट्रीय चेतना आणखी प्रखर बनवू. आम्हा सर्वांचा संकल्प आहे की मानव सेवा आणि राष्ट्राचे निर्माण आणि सनातन संस्कृतीचे संरक्षण यासाठी सतत कार्य करत राहू. माहिलांची जागरूकता आणि सहभागच देशाला बलवान बनवतो,” असे कंगना रणौत त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.