मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच फडणवीसांकडून माझे एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न केला जातोय, असे जरांगे म्हणाले आहेत. मनोज जरांगे आता फडणवीसांच्या सागर या शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन करण्यासाठी मुंबईकडे निघाले आहेत. जरांगे यांच्या या आरोपांनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते रोहित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी फडणवीसांचे थेट नाव न घेता भाजपाला लक्ष्य केलंय. ते माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.

राजकीय परंपरा, विचारसरणी फडणवीसांनी मोडीत काढली

“आपल्या या महाराष्ट्रात धर्मवाद आणि जातीवाद कधीच नव्हता. कारण या भूमीत संतांच्या विचारांची, महापुरुषांच्या विचारांती ताकद आहे. मात्र देवेंद्र फडणवीस २०१४ साली जेव्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून महाराष्ट्राची कोणतीही परंपरा कायम राहिली नाही. राजकीय परंपरा, विचारसरणी होती ती फडणवीसांनी मोडीत काढली. २०१४ सालानंतर महाराष्ट्रातील विचारांचं आणि राजकीय परंपरेचं नुकसान हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे,” असं रोहित पवार म्हणाले.

“ओबीसी विरुद्ध मराठा हे चित्र कोण निर्माण करतंय”

“२०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कोरेगाव भीमाची दंगल झाली. ही दंगल झाली की घडवली गेली हे बघावं लागेल. पण या दंगलीनंतर भाजपाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा झाला. त्या काळात महाराष्ट्रात जातीवाद मोठ्या प्रमाणात पसरला होता. आतादेखील योगायोग म्हणा की चुकून ही बाब घडली समजा मात्र महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असे चित्र निर्माण केले जात आहे. आता लवकरच लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे ओबीसी विरुद्ध मराठा हे चित्र कोण निर्माण करतंय. याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल,” असंही रोहित पवार म्हणाले.

भाजपाला धर्मवाद आणि जातीवाद यात रस

भाजपा हा जातीवादी पक्ष आहे, असा दावा करताना त्यांनी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीचा दाखला दिला. “कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपाने जातीवाद आणि धर्मवाद केला होता. भाजपाचा विचार प्रतिगामी आहे. भाजपाला धर्मवाद आणि जातीवाद यात रस आहे. कोणत्याही समाजाला आरक्षण मिळावं, असी भाजपाची भूमिका कधीही राहिलेली नाही, असा आरोप रोहित पवार यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर काय आरोप केले?

मनोज जरांगे यांनी अंतरवाल सराटी येथे मराठा आंदोलकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठ्यांचा राज्यावर पुन्हा एकदा दरारा निर्णय झाला आहे. हा दरारा संपवण्याचे त्यांचे स्वप्न आहे. विशेष म्हणजे हा दरारा मराठ्यांच्याच हाताने संपवण्याचे काम चालू आहे. यात एकनाथ शिंदे यांचे दोन-चार लोक आहेत. अजित पवार यांचेही दोन आमदार आहेत. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाहीये. १० टक्के आरक्षण मराठ्यांवर लादले जात आहे. मनोज जरांगे ऐकत नाही म्हणून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. मनोज जरांगेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय किंवा मनोज जरांगेला उपोषणात मरु द्यावे, यासाठी प्रयत्न केला जातोय. मला सलाईनमधून विष देण्याचा विचार केला जातोय. त्यामुळेच मी परवा रात्रीपासून सलाईन बंद केले आहे. माझं एन्काउंटर करावं लागेल असं फडणवीस यांचं स्वप्न आहे.