विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. विधिमंडळात दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक खटके उडत होते, पण गुरुवारी मात्र त्यांचे कार्यकर्ते भिडले.

दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला पोलिसांनी रात्री १२ वाजता विधानभवनातून अटक केली. त्यानंतर आव्हाड कार्यकर्त्यांसह विधानभवन परिसरात गेले आणि पोलिसांच्या कारसमोर ठिय्या दिला. यावेळी त्यांच्याबरोबर आमदार रोहित पवार देखील गेले होते. आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना अटक झाल्याने रोहित पवारांचा पारा चढला.

पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं?

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात झालेल्या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत रोहित पवार पोलिसांना म्हणाले, “हातवारे करून बोलू नका, आवाज खाली करा. शहाणपण करू नका. हात खाली. सांगतोय तुम्हाला. नीट बोलता येत नसेल तर बोलायचं नाही. आमदाराला हात लावायचा नाही. हातवारे करू नका.” कार्यकर्तेही यावेळी पोलिसांवर भडकलेले दिसतायत. साहेबांना हात लावायचा नाही, असं तो मोठ्याने बोलताना ऐकू येतंय.

फक्त पीआय असून आमदारांना या पद्धतीने बोलता, तुम्ही आदर ठेवायला हवा, असंही एक व्यक्ती पोलिसांना म्हणते. नंतर जितेंद्र आव्हाड तिथे येतात व पोलिसांशी बोलतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही संताप व्यक्त केला होता. “मकोकासारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी पसार होतो आणि जो मार खातो त्याला पोलीस घेऊन जातात. विधानसभा अध्यक्षांनी शब्द दिला होता की नितीनला सोडणार. मात्र, त्यांनी शब्द फिरवला, आम्हाला फसवलं,” असं या प्रकरणी आव्हाड म्हणाले. तर रोहित पवारांनी नितीन देशमुखला पाठिंबा देत असल्याचं वक्तव्य केलं.