महादेव मुंडे यांची हत्या २१ ऑक्टोबर २०२३ ला करण्यात आली होती. या हत्येला २१ महिन्यांहून अधिक कालावधी उलटला तरीही आरोपी मोकाट आहेत. या प्रकरणी महादेव मुंडेंच्या पत्नी आणि मुंडे कुटुंबाने नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कारवाईचं आश्वासन दिलं होतं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणातला मुख्य आरोपी देश सोडून जाण्याच्या तयारीत आहे अशी पोस्ट केली आहे.
रोहित पवार यांची पोस्ट काय?
महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुंडे कुटुंबीयांना ज्या आरोपीवर मुख्य संशय आहे, तो आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती कळत असून पोलीस यंत्रणांनी यासंबंधित खातरजमा करून त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. आज उद्या पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या नाही तर आरोपी पसार होण्याची शक्यता आहे. मुंडे कुटुंबाला मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आश्वासनानुसार SIT मध्ये पोलीस अधिकारी संतोष साबळे यांचा अद्यापही समावेश झालेला नाही, तपासाला गती देण्यासाठी त्यांचा SIT मध्ये त्वरित समावेश करावा, ही विनंती! अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणानंतर काय काय घडलं?
१) महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हत्या झाली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विधानसभेत आवाज उठवणारे आमदार सुरेश धस यांनी परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण सर्वात पहिल्यांदा समोर आणलं.
२) २४ जानेवारी २०२५ या दिवशी आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन महादेव मुंडे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यासाठी निवेदन दिले.
२५ जानेवारी २०२५ ला अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला.
२७ जानेवारी २०२५ या दिवशी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अंबाजोगाई पोलीस उपाधीक्षकांची भेट घेतली.
२८ जानेवारी रोजी परळी शहर पोलीस ठाण्याकडून या प्रकरणाची सगळी कागदपत्रं पोलीस उपाधीक्षकांना सुपूर्द करण्यात आले.
११ फेब्रुवारीला महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास सीआयडी एसआयटीमार्फत करावा, यासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली.
१३ फेब्रुवारीला पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह चार कॉन्स्टेबल असणाऱ्या पथकाची तपासण्यासाठी नेमणूक करण्यात आली.
१८ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महादेव मुंडे कुटुंबियांची परळीत येत भेट घेतली. यावेळी बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर हे देखील त्यांच्यासोबत होते.
२२ फेब्रुवारीला सुरेश धस यांनी महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेत या प्रकरणात त्यांची साथ देणार असल्याचे सांगितले. दरम्यानच्या काळात परळी माजलगाव येथे महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी कॅण्डल मार्च देखील काढण्यात आला
१५ जुलैला वाल्मिक कराड याचे जुने सहकारी असलेले पाटोदा येथील बाळा बांगर यांनी महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेतली आणि भावाप्रमाणे त्यांच्या या लढ्यात सोबत राहणार असल्याचे सांगितले.
२१ जुलैला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे कुटुंबीयांची परळी येथे येऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्र्याचे ओएसडी यांना फोन करत या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.
२१ जुलैला महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराड, भावड्या कराड, श्री कराड, गोट्या गित्ते आणि राजेश फड यांचा पीसीआर घेण्याची ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मागणी केली.
२९ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महादेव मुंडे कुटुंब यांची भेट घेत संपूर्ण प्रकरण समजावून घेतले आणि त्यांनी राज्यातील तीनही मोठ्या नेत्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केलं
२९ जुलै रोजी महादेव मुंडे कुटुंबीयांना मुख्यमंत्री कार्यालयातून भेटीसाठी फोन करण्यात आला.
३१ जुलैला महादेव मुंडे कुटुंबीय मुख्यमंत्री यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यांना सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.