Rohit Pawar On CM Devendra Fadnavis meet PM Modi in delhi : राज्यात केल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यात शेती आणि मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील पाऊस, पूरस्थिती आणि त्यातून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती पंतप्रधानांना दिली. केंद्र सरकारकडून भरीव मदतीसाठी एक निवेदनही त्यांना सादर केले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर नेमकी दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली याबद्दल मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना माहिती दिली. या भेटीनंतर राज्यासाठी भरीव मदतीचे आश्वासन मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. य़ावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनंतर टीका केली आहे. प्रतिक्रियेमध्ये केंद्राकडून कोरड्या आश्वासनाशिवाय काहीही न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांची हतबलता स्पष्टपणे दिसून आली, असे रोहित पवार म्हणाले आहेत. त्यांनी एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे.

“नैसर्गिक आपत्तींमुळे अडचणीत आलेल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी केंद्राची मदत गरजेची असून त्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी पंतप्रधानांची भेट घेतली, या भेटीतून केंद्राकडून मदत जाहीर होईल, अशी अपेक्षा होती,” असे रोहित पवार म्हणाले.

“परंतु मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिलेली प्रतिक्रिया बघता महाराष्ट्राला ओल्या दुष्काळासाठी केंद्राकडून कोरड्या आश्वासनाशिवाय काहीही न मिळाल्याने मुख्यमंत्र्यांची हतबलता स्पष्टपणे दिसून आली. देशाच्या तिजोरीत सर्वाधिक हातभार लावणारा महाराष्ट्र अडचणीत असताना केंद्र सरकर मदत करत नसेल तर मग महाराष्ट्राचे दिल्लीतले वजन कमी झाले आहे का ? असा प्रश्न पडतो …” असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांची पंतप्रधानांशी नेमकी काय चर्चा झाली?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर महाराष्ट्रातील पूर परिस्थितीबाबत झालेल्या चर्चेबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधानांना एक निवेदन मी दिले आहे. माझ्या वतीने आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांच्या सहीने हे निवेदन आम्ही दिले आहे. त्यांना ऐकूण महाराष्ट्रातील पूर परिस्थितीची कल्पना आम्ही दिली, कसं नुकसान झालं आहे त्याबद्दल सांगितलं. त्यांना विनंती केली की आम्हाला एनडीआरएफच्या माध्यमातून भरीव मदत करा आणि जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी मदत आपण करावी. त्यांनी देखील त्याला सकारात्मकता दाखवली आहे. त्यांनी सांगितलं की, लवकरात लवकर प्रस्ताव येऊ द्या, प्रस्ताव आला की आम्ही कारवाई करू. जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी करण्याचं आश्वासन देखील पंतप्रधानांनी दिले आहे.”