Rohit Pawar : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं, तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं अपयश मिळालं. या अपयशानंतर आता महाविकास आघाडीतील पक्षांकडून अपयशाची कारणे शोधण्याचं काम सुरु आहे. मात्र, असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना संपर्क करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजित पवार गटाकडून शरद पवारांच्या ८ पैकी ७ खासदारांना आपल्याकडे येण्याची ‘ऑफर’ देण्यात आली होती, अशी चर्चा आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता यावर आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया देत सूचक भाष्य केलं आहे. “संसदेचं अधिवेशन सुरु होतं, तेव्हा सुनील तटकरे यांनी आमच्या खासदारांशी संपर्क केल्याची चर्चा आहे. पण आमचे खासदार असा कोणताही निर्णय घेतील असं आपल्याला वाटत नाही”, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Video : पालकमंत्री पदासाठी एवढी साठमारी का होते? लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं सखोल विश्लेषण

रोहित पवार काय म्हणाले?

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून शरद पवार गटाच्या खासदारांना पक्षात येण्यासाठी ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा आहेत. यासंदर्भात बोलताना रोहित पवार म्हणाले, “आमदारांच्या बाबतीत कोणताही अशा प्रकारे अजित पवार गटाकडून संपर्क झाला अस वाटत नाही. मात्र, खासदारांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास संसदेचं अधिवेशन सुरु होतं, तेव्हा सुनील तटकरे यांनी आमच्या खासदारांशी संपर्क केल्याची चर्चा आहे. मात्र, अशा प्रकारे कितीही संपर्क झाला असला तरी आमचे आमदार किंवा खासदार कोणताही निर्णय घेतील असं वाटत नाही. कारण आम्ही सर्वजण शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक आहोत. शरद पवार जे सांगतील ते आम्ही करणार आहोत”, असं रोहित पवार यांनी म्हटलं.

“अजित पवारांच्या पक्षात असणारे सर्व लोक शरद पवार यांचा आदर करणारे आहेत असं मला वाटतं. पण सुनील तटकरे यांच्याबाबत मला सांगता येणार नाही. कारण सुनील तटकरे हे जसं वारं आहे आणि जसे अधिकार आहेत तशा पद्धतीने ते भूमिका घेतात. आज ते सत्तेत आहेत, त्यामुळे त्यांच्या अनेक अडचणी सुटलेल्या आहेत. त्यामुळे ते कोणतीही भूमिका घेत असताना व्यक्तिगत भूमिका घेतात. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात अजित पवार हे प्रमुख आहेत. पण तरीही सुनील तटकरे यांचं जास्त चालतं. त्यामुळे त्यांच्या बाबतीत मला जास्त काही सांगता येणार नाही”, असं रोहित पवारांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित पवार पुढे म्हणाले की, “सुनील तटकरे हे त्यांच्या त्यांच्या पातळीवर हे डील करत असावेत. कारण अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख असले तरी सुनील तटकरे यांचा त्यांच्या पक्षात जास्त हस्तक्षेप चालतो. त्यामुळे जोपर्यंत अजित पवार यासंदर्भात कोणतंही वक्तव्य करत नाहीत, तोपर्यंत कोणत्याही वक्तव्यावर खरं समजलं पाहिजे असं मला वाटत नाही”, असंही रोहित पवार यांनी म्हटलं.