Rohit Pawar On Jaykumar Gore : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलंच राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्य सरकारवर टीका करत आहेत. रोहित पवार यांनी आज एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर करत भारतीय जनता पक्षाचे नेते तथा मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘हिंमत असेल तर समोर या, ओपन डिबेट करू, स्थळ वेळ सगळं तुम्ही ठरवा, आहे का हिंमत?’, असं म्हणत खुलं आव्हान दिलं आहे.
रोहित पवारांनी काय म्हटलं?
“जयकुमार गोरेजी आपण आधीच ‘उघडे’ पडले आहात, त्यामुळे उघड्या लोकांच्या तोंडून झाकली मूठ अशा गप्पा शोभत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने भिसे जमीन प्रकरणात तर उच्च न्यायालयाने शोषण प्रकरणात आपला जामीन फेटाळताना काय शेरे मारले होते ते पुन्हा एकदा सांगू का? असेल हिंमत तर या समोर, ओपन डिबेट करू…स्थळ वेळ सगळं तुम्ही ठरवा, आहे का हिंमत?”, असं रोहित पवारांनी जयकुमार गोरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
मंत्री जयकुमार गोरेंनी काय म्हटलं होतं?
जयकुमार गोरे यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली होती आणि म्हटलं होतं की, झाकली मूठ सव्वा लाखाची, तुमचे जमीन घोटाळे निघाले तर कुठपर्यंत जातील, याचा विचार करावा’, असा इशारा मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवार यांना दिला होता. त्यानंतर आता रोहित पवार यांनी ट्विट करत थेट खुली चर्चा करण्याचं आव्हानच दिलं आहे.
मा. जयकुमार गोरे जी आपण आधीच ‘उघडे’ पडले आहात, त्यामुळे उघड्या लोकांच्या तोंडून झाकली मूठ अशा गप्पा शोभत नाहीत… सर्वोच्च न्यायालयाने भिसे जमीन प्रकरणात तर उच्च न्यायालयाने शोषण प्रकरणात आपला जामीन फेटाळताना काय शेरे मारले होते ते पुन्हा एकदा सांगू का? असेल हिंमत तर या समोर,…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 10, 2025
‘…तेंव्हा सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून सरकारची नोंद होईल’ : रोहित पवार
“देवेंद्र फडणवीस सरकार घोटाळ्यांनी बरबटलेलं असून यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि जनता यांची कोणतीही भीती या निगरगट्ट सरकारला राहिलेली नाही. कोळसा देखील लाजेल असे काळे कारनामे या सरकारचे आहेत. जेंव्हा या सरकारच्या काळ्या कारनाम्यांची श्वेतपत्रिका निघेल तेंव्हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणून या सरकारची नोंद होईल. परप्रांतीय दलाल आणि कंत्राटदारांना हाताशी धरून मलिदा खाल्ला जातोय. पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि गडचिरोली हे या सरकारचे मलिदा खाण्याचे हॉटस्पॉट आहेत”, अशी टीका रोहित पवारांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस सरकार घोटाळ्यांनी बरबटलेले असून यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि जनता यांची कोणतीही भीती या निगरगट्ट सरकारला राहिलेली नाही. कोळसा देखील लाजेल असे काळे कारनामे या सरकारचे आहेत. जेंव्हा या सरकारच्या काळ्या कारनाम्यांची श्वेतपत्रिका निघेल तेंव्हा महाराष्ट्राच्या इतिहासातील…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 10, 2025
“पुण्यात सरकारी जमिनी, मुंबईत SRA च्या जमिनी, नवी मुंबईत वन खात्याच्या जमिनी तर गडचिरोलीत खाणपट्टे… हे या सरकारचे आवडते खाद्य आहे. सुलतान मिर्झाने ज्या प्रमाणे मुंबई गुंडांमध्ये वाटली होती त्याप्रमाणे तिन्ही पक्षांनी शहरे आणि विभाग वाटून घेतले आहेत. तिन्ही पक्ष भ्रष्टाचाराने बरबटलेले असून एकमेकांना सांभाळून घेत आहेत…हे सर्व बघता ‘करून वोटचोरी सुरूय महाराष्ट्राची लुटमारी’ असंच म्हणावं लागेल”, अशा शब्दांत रोहित पवारांनी सरकारवर टीका केली.
