गेल्या काही काळापासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. भाजपाच्या अनेक नेत्यांनी अशाप्रकारचे दावेही केले होते. त्यानंतर आज अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. अशोक चव्हाण यांच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मागच्या काही दिवसांपासून मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर अशोक चव्हाण आणि त्यांच्यासह इतर काही आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी

रोहित पवार यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी म्हटले, “विचारधारेसाठी लढण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असताना संपूर्ण आयुष्यभर ज्या विचारधारेसाठी लढलो त्याच विचारधारेचा त्याग करून भाजपशी सलगी करण्याची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी आहे. भाजपसोबतच्या सलगीचं हे सत्र असंच सुरु राहीलं तर अस्मिता आणि विचारधारेसाठीचा पुढील लढा सर्वसामान्यांनाच लढावा लागेल आणि जनताही त्यासाठी सज्ज आहे!”

“आगे आगे देखिए होता है क्या…”, अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशाबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य

अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदारही राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जाते. महायुतीमधील शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा हे तीनही घटक पक्ष काँग्रेसमधील नेते आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाची संपूर्ण वाताहात होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

“अशोक चव्हाणसुद्धा काँग्रेसवर दावा करून…” संजय राऊतांची सूचक पोस्ट, म्हणाले…

भाजपा पक्ष सर्वांसाठी खुला – बावनकुळे

अशोक चव्हाण यांच्या संभाव्य भाजपा प्रवेशावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “मी यापूर्वीच सांगितले आहे की, काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर धुसफूस आहे. त्यांच्यात अनेक अंतर्गत वाद आहेत. तसेच नेत्यांमध्ये समन्वय घडवून आणण्याची केंद्रीय नेतृत्वात क्षमता नाही. त्यामुळं अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असेल तर त्याचे कारण काय, हे तपासले पाहीजे. पण काँग्रेसचे अनेक नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. हे मी याठिकाणी पुन्हा सांगतो.”

अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला फायदा होईल का? या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, पक्षप्रवेश बुथस्तरावरचा असो किंवा राज्यपातळीवरचा त्याचा निश्चितच फायदा होत असतो. तसेच चव्हाण यांचा जर प्रवेश झाला तर आम्हाला आनंदच होईल. काँग्रेसमधील अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी तयार आहेत. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांनी तर निर्णय घेतला आहेच. इतरही नेते लवकरच निर्णय घेतील.