भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बोचरी टीका केली. अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे, अशा शब्दांत पडळकरांनी टीकास्र सोडलं. या टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पडळकरांचा उल्लेख ‘चॉकलेट बॉय’ असा करत अजित पवार गटातील बड्या नेत्यांनाही लक्ष्य केलं.

आमदार रोहित पवार म्हणाले, “भाजपाने निर्माण केलेले नेते गरळ ओकत आहेत. खालच्या पातळीवर जाऊन राजकीय वक्तव्यं करत आहेत. त्यांची बौद्धिक क्षमता नसल्यामुळे जे मनाला येईल आणि बुद्धीला सुचेल, असं ते बोलत आहेत. पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की, भाजपाचे छोटे नेते बोलत असताना भाजपाचे मोठे नेते शांत बसतात. यातून एकच निष्कर्ष निघू शकतो, भाजपाच्या मोठ्या नेत्यांचा या छोट्या नेत्यांना पाठिंबा आहे.

हेही वाचा- “पडळकरांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गट आक्रमक

“हे छोटे नेते (गोपीचंद पडळकर) शरद पवार किंवा सुप्रिया सुळे किंवा त्यांच्याबरोबर सत्तेत असणारे नेते अजित पवार यांच्याबद्दलही बोलले. पण एवढं बोलूनही अजित पवार गटाचे मोठे नेते शांत आहेत. भाजपाचे अनेक पदाधिकारी शांत आहेत. या सगळ्या गोष्टी पाहून आम्हाला आश्चर्य वाटतं,” अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली. ते अहमदनगरमध्ये ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा- प्रफुल्ल पटेलांनी शरद पवारांची घेतली भेट; ‘त्या’ फोटोवर वंदना चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोपीचंद पडळकरांचा ‘चॉकलेट बॉय’ असा उल्लेख करत रोहित पवार पुढे म्हणाले, “चॉकलेट बॉय, पडळकर हे जेव्हा सत्तेत असतात, तेव्हा धनगर आरक्षणाबाबत त्यांची भूमिका वेगळी असते. पण ते जेव्हा विरोधात असतात तेव्हा ते आक्रमक असतात. धनगर आरक्षण, एसटीचे प्रश्न, यूपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ते आक्रमक असतात. पण सत्तेत गेल्यानंतर ते झोपतात.”