अलीकडेच कर्जत येथे अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट केले. भाजपाबरोबर सत्तेत जाण्याची इच्छा शरद पवारांची होती. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो, तुम्ही सत्तेत जा, असं स्वत: शरद पवारांनीच सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. पण शरद पवारांनी अजित पवारांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितलेल्या अनेक बाबी मला पहिल्यांदाच समजत आहेत, असं पवारांनी म्हटलं.

या संपूर्ण प्रकरणावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाबरोबर जाण्याचं शरद पवारांनी कधीच सांगितलं नाही, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं. अजित पवार आणि त्यांचा मित्र परिवार भाजपाबरोबर गेला आहे. त्यामुळे तिकडे जाण्याची इच्छा कुणाची होती आणि कशासाठी होती? हे आपल्या सर्वांना माहीत आहे, असंही रोहित पवार म्हणाले. ते अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवारांच्या विविध गौप्यस्फोटाबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “त्यांनी कुठले कुठले खुलासे केले, हे मला माहीत नाही. कारण जी भाषणं संविधानाला धरून आणि विचाराला धरून असतात, तीच भाषणं आम्ही ऐकत असतो. आता ते तिकडे गेल्यामुळे त्यांची भाषणं आम्हाला पटत नाहीत आणि समजतही नाहीत. भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय शरद पवारांचा असता, तर आमची संपूर्ण पार्टी भाजपाबरोबर सत्तेत गेली असती. पण ती तशीच आहे. आम्ही त्यांच्याबरोबर (शरद पवार) आहोत. अजित पवार आणि त्यांचा मित्र परिवार भाजपाबरोबर गेला आहे. त्यामुळे भाजपाबरोबर जाण्याची इच्छा कुणाची होती? आणि कशासाठी होती? हे आपल्या सर्वांना माहीत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.