राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २४ वा वर्धापन दिन पार पडला. वर्धापन दिनाचं औचित्य साधत एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली. या निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. संबंधित बैठकीला अजित पवार उपस्थित नसल्याने ही चर्चा सुरू झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. शरद पवारांनी सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच ही घोषणा केली. अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात महत्त्वाचं आणि संविधानिक पद आहे. अजित पवार महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत. अशा स्थितीत त्यांच्याकडे पक्षाचं एखादं पद दिलं तर तो अन्याय ठरला असता, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बैठकीतील अनुपस्थितीनंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलणं टाळलं, याबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “अजित पवार हे नेहमी-नेहमी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत नाहीत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदानंतर ‘विरोधी पक्षनेते’ हे पद सर्वात महत्त्वाचं पद आहे. ते पद आता अजित पवारांकडे आहे. आमदार म्हणून आम्ही सर्वजण त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. जेव्हा एखादी व्यक्ती मंत्री असते, मंत्री असतानाच त्यांच्याकडे पक्षाचं एखादं पद असेल, तर राज्यावर किंवा पक्षावर अन्याय होत असतो. त्याचप्रमाणे अजित पवारांकडे आता विरोधी पक्षनेतेपद आहे. अशा स्थितीत त्यांना पुन्हा पक्षाचं एखादं पद दिलं असतं, तर कुठे ना कुठे अन्याय झाला असता. अजित पवार हे महाराष्ट्रातील तमाम सामान्य माणसांचे प्रश्न मांडत असतात. विरोधी पक्षनेते म्हणून ते हे प्रश्न मांडतात. त्यांचं हे पद अतिशय महत्त्वपूर्ण आणि संविधानिक पद आहे.”

हेही वाचा- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

नाराजीच्या चर्चेदरम्यान अजित पवारांनी स्वत: ट्विटरवरून सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह नवीन जबाबदारी मिळालेल्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांचं अभिनंदन केलं आहे. अजित पवार ट्वीटमध्ये म्हणाले,”राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी शरदचंद्र पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच खासदार सुनील तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.”

“शरदचंद्र पवारसाहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरेसमोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!” असंही अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit pawar reaction over supriya sule appoinment as working president ajit pawar upset rmm
First published on: 10-06-2023 at 15:59 IST